Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या ऐवजी त्यांची जयंती साजरी होतेय. 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांसह राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाढदिवसाऐवजी जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे. अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं दादांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून पार्थ पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पार्थ पवार यांची एक्स पोस्ट

दादा…

आज पूर्ण दिवस गेला, पण तुमच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द लिहिण्याचं धाडसच होत नव्हतं. 

दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुमच्याविषयी व्यक्त होणारं प्रेम आणि आदर पाहताना तुमच्या आठवणी सतत डोळ्यांसमोर येत राहिल्या.

तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते आहे.

दादा, तुम्ही असताना प्रत्येक संघर्ष सोपा वाटायचा. आज प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते. पण तुम्ही काळजी करू नका. तुमच्यावर प्रेम करणारी महाराष्ट्रातील जनता, तुमच्या लाडक्या बहिणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाखो निष्ठावान कार्यकर्ते व सर्व आमदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

महाराष्ट्राची सेवा करताना तुमच्यासाठी प्रत्येक माणूस महत्त्वाचा होता. त्याच भावनेने आम्ही तुमचं कार्य पुढे नेत राहू.

तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच कायम राहू देत. तुम्ही सदैव आमच्या हृदयात राहाल! 🙏

आपलाच,
पार्थ

जय पवार काय म्हणाले? 

दादा जसे कठोर आणि कडक होते तसंच त्यांचं प्रेम भरपूर आहेत.अजितदादा वडील म्हणून खूप कठोर होते, आम्ही सगळे घाबरुन असायचो. दादा सोमवार ते गुरुवारी दादा मुंबईत असायचे. आम्ही घरी आलो की दादांचा आवाज आला की आम्ही अटेन्शन मोडवर असायचो, असं जय पवार म्हणाले. वडील दादांचं आमच्या दोघांवर खूप प्रेम असायचं. दर दिवाळीला आम्ही बारामतीत असायचो. चुकीचं काही करायचं नाही अशी त्यांच्या मनातील भावना होती. दादांनी आमच्या दोघांचे पाय कायम जमिनीवर ठेवले, दादा घरातील सर्वांना हसवायचे. दिवाळीला कुटुंबातील सर्वांना एकत्र आणायचे. दादा सर्वांना एकत्र घेऊन दिवाळी साजरी करायचे, अशी आठवण जय पवार यांनी सांगितली.   

हेदेखील वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *