Shabana Azmi Asthama Attack in CJP Protest: नीट पेपरफुटी प्रकरणाने सध्या देशभरातील विद्यार्थ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी करत शेकडो विद्यार्थी सोमवारी संसदेवर धडकले. पावसाळी अधिवेशनासाठी पंतप्रधान मोदींसह इतर मंत्री, नेते संसदेत उपस्थित असताना संसदेबाहेर लोंढेच्या लोंढे दाखल होऊ लागले. कॉकरोच जनता पार्टीसह विद्यार्थ्यांचे आंदोलन पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रु धुराच्या नळकांड्याचा वापर करण्यात आला. सोशल मीडियावर घडल्या प्रकाराचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गजांनी पाठिंबा दिला. CJP च्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांची आंदोलनादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अश्रुधुरामुळे त्यांना अस्थमाचा झटका आला होता. मात्र, वेळेवर इनहेलरचा वापर केल्यामुळे प्रकृती नियंत्रणात आल्याचे त्यांनी सांगितलं.
काय म्हणाल्या शबाना आझमी?
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी म्हणाल्या, “आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर अश्रुधुरामुळे मला अस्थमाचा झटका आला. सुदैवाने माझ्याकडे इनहेलर होता. त्यामुळे मी स्वतःला सावरू शकले. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी मला जवळच्या इमारतीत नेले. प्रकृती सुधारल्यानंतर मी पुन्हा आंदोलनस्थळी गेले आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. त्या सर्वांना माझा सलाम.”
‘मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही’
शबाना आझमी यांनी आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचेही स्पष्ट केले.”मला कोणत्याही पक्षाचा भाग व्हायचे नाही. पक्षात गेल्यानंतर त्या पक्षाच्या भूमिकेनुसार मत व्यक्त करावे लागते. मला मात्र माझी स्वतंत्र भूमिका कायम ठेवायची आहे. मी आंदोलनात गेले कारण विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे मला महत्त्वाचे वाटले,”असे त्या म्हणाल्या.
‘विद्यार्थ्यांच्या मागण्या चुकीच्या नाहीत’
विद्यार्थ्यांच्या मागण्या चुकीच्या किंवा धोकादायक नसल्याचेही शबाना आझमी यांनी नमूद केलं. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, यासाठी विद्यार्थी जे प्रश्न उपस्थित करत आहेत, ते महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच, सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकावे, असे आवाहनही त्यांनी केले. याच भूमिकेमुळे आपण CJP आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.