मुंबई : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (Mhada Lottery) सर्वे क्रमांक १२६+१२७/१, मौजे ताथवडे, पुणे (Pune) येथील टप्पा–२ अंतर्गत एकूण ६३४ सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. मंडळाच्या गृहनिर्माण भवनातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये मंडळाचे सभापती आढळराव पाटील यांनी ताथवडे गृहनिर्माण योजनेची माहिती दिली.
सदर योजनेतील मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांकरिता उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले व अधिकाधिक नागरिकांनी आपले हक्काचे घर मिळवण्यासाठी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ताथवडे परिसरातील ही योजना पुणे महानगर परिसरात गुणवत्तापूर्ण, नियोजनबद्ध आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या म्हाडाच्या प्रयत्नांना बळकटी देणारी असून, पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे करण्यात आले आहे. म्हाडाच्या सोडतीच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करून अर्ज करण्याची प्रक्रिया अविरत सुरु असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये 768 घरांसाठी जाहिरात
यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये ताथवडे टप्पा–२ अंतर्गत २४ सदनिका अल्प उत्पन्न गट (LIG) व ७६८ सदनिका मध्यम उत्पन्न गट (MIG) अशा एकूण ७९२ सदनिकांच्या विक्रीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या योजनेसाठी अल्प उत्पन्न गटातील २४ सदनिकांसाठी ४३८ अर्ज, तर मध्यम उत्पन्न गटातील ७६८ सदनिकांसाठी ३०४ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १३५ यशस्वी अर्जदारांनी स्वीकृती कळविली. अशाप्रकारे ७९२ सदनिकांपैकी पैकी १५० सदनिकांच्या वितरणाची कार्यवाही मंडळातर्फे करण्यात येत आहे. उर्वरित अल्प उत्पन्न गटातील १ व मध्यम उत्पन्न गटातील ६३३ सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात आता प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्वे क्रमांक १२६+१२७/१ ताथवडे पुणे येथील टप्पा–२ मधील अल्प उत्पन्न गटातील सदनिकेची किंमत रु. ४६ ते ४७ लक्ष दरम्यान आहे व बांधकामाचे क्षेत्रफळ ७५.९६ चौ. मी. ते ७७.९९ चौ मी एवढे आहे . तसेच मध्यम उत्पन्न गटातील प्रती सदनिका किंमत रु. ६४.५० ते ६५.५० लक्ष दरम्यान आहे व बांधकामाचे क्षेत्रफळ ८९.१५ चौ. मी. ते ९१.१८ चौ मी एवढे आहे.
चारचाकी वाहनासाठी पार्किंगची सुविधा
या योजनेमध्ये चार चाकी वाहनाकरीता प्रती सदनिका एक वाहनतळ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रहिवाशांकरिता स्विमिंग पूल, क्लब हाऊस, इनडोअर गेम्स क्षेत्र, मुलांसाठी सुसज्ज खेळण्याची जागा, ओपन जिम, सौरऊर्जेवर आधारित ऑन-ग्रिड सोलर प्रणाली, इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसह आधुनिक व पर्यावरणपूरक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर प्रसंगी पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री राहुल साकोरे , मंडळाचे उपमुख्य अधिकारी श्री राहुल शिळीमकर , मिळकत व्यवस्थापक श्री रामचंद्र भोसले व श्री रुपेश जायभाये व मंडळातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं