देशभरात सोन्याच्या किमतीतील घसरणीचा कल कायम असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी बहुतेक शहरांमध्ये सोन्याचे दर आणखी कमी झाले. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून प्रति 10 ग्रॅम ₹1,43,430 वर पोहोचला, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹1,31,440 प्रति 10 ग्रॅम इतकी नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत नरमाई दिसून आली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस 4,000.55 डॉलरवर घसरला आहे. तसेच ऑगस्ट डिलिव्हरीसाठीच्या अमेरिकन गोल्ड फ्युचर्सची किंमतही प्रति औंस 4,005.9 डॉलरवर आली आहे. सोन्याचे भाव खाली आल्याने खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांना ही गुड न्यूज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मिळाली आहे.
दरम्यान, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 90 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे महागाईबाबतची चिंता पुन्हा वाढली असून, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदारांचा कल इतर गुंतवणूक पर्यायांकडे वळण्याची शक्यता असल्याने सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
तसेच भूराजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. अमेरिकेने इराणवर सलग नवव्या रात्री हल्ले केल्याचे वृत्त आहे. जॉर्डनवरील इराणी हल्ल्यांमध्ये किमान दोन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, इराणने जॉर्डनच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरांत आजचे सोन्याचे दर
दिल्ली: 24 कॅरेट – 1,43,430 रुपये, 22 कॅरेट – 1,31,440 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई, कोलकाता: 24 कॅरेट – 1,43,280 रुपये, 22 कॅरेट – 1,31,340 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
चेन्नई: 24 कॅरेट – 1,43,280 रुपये, 22 कॅरेट – 1,31,340 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
पुणे, बंगळुरू: 24 कॅरेट – 1,43,280 रुपये, 22 कॅरेट – 1,31,340 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
चांदीच्या दरातही घसरण
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही घसरण कायम आहे. 20 जुलैच्या सकाळी चांदीचा दर प्रति किलो 2,29,900 रुपये इतका नोंदवला गेला. काही महिन्यांपूर्वी चांदीच्या भावाने उच्चांक गाठला होता, मात्र आता गेल्या काही काळत चांदीचे दरही खाली आले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव प्रति औंस 56.42 डॉलरवर आला आहे.