Lord Shiv: भगवान शंकर…जे महादेव, भोलेनाथ, नीलकंठ, महेश आणि महाकाल अशा अनेक नावांनी ओळखले जातात.. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तींपैकी संहार आणि परिवर्तनाचे अधिपती मानले जातात. मात्र, ‘संहार’ म्हणजे केवळ विनाश नव्हे, तर नव्या सृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले परिवर्तन, असा त्याचा अर्थ मानला जातो. आपण नेहमी पाहतो, भगवान शिवाचे रूप हे इतर सर्व देवांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इतर देवांचे स्वरूप सोने, हिरे आणि इतर मौल्यवान दागिने परिधान केलेले असतात, मात्र भगवान शिव आपल्या शरीरावर भस्म धारण करतात आणि गळ्यात सर्प धारण करतात. खरं सांगायचं झालं तर, भगवान शंकरांच्या गळ्यातील सर्प हे केवळ अलंकार नसून त्यामागे खोल धार्मिक, आध्यात्मिक आणि तात्त्विक अर्थ दडलेला आहे. शिवाच्या प्रत्येक अलंकाराप्रमाणे सर्पालाही विशेष महत्त्व आहे. भक्तांना अनेकदा प्रश्न पडतो की, भगवान शंकरांनी आपल्या गळ्यात सर्प का धारण केला आहे? या सर्पाचे नाव काय? पौराणिक कथा जाणून घ्या…
भगवान शिवाने आपल्या गळ्यात सर्प का धारण केला आहे? (Lord Shiv)
एका आख्यायिकेनुसार, समुद्रमंथन झाले, तेव्हा वासुकी सर्पाला एका बाजूला देवांनी आणि दुसऱ्या बाजूला राक्षसांनी धरले होते. समुद्रमंथनातून अनेक गोष्टी निर्माण झाल्या, ज्या राक्षस आणि देवांमध्ये वाटण्यात आल्या. समुद्रमंथनातून विषही निर्माण झाले आणि जगाला वाचवण्यासाठी शिवाने ते विष प्राशन केले. समुद्रमंथनादरम्यान वासुकी गंभीर जखमी झाला. त्याची भक्ती पाहून शिवाने त्याला आपल्या गळ्यात धारण केले असे मानले जाते.
भगवान शिवाच्या गळ्यातील सर्प नेमका कोण आहे?
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकरांना, भोलेनाथ असेही म्हटले जाते, त्यांचा स्वभाव अत्यंत भोळा असल्याचे मानले जाते. भगवान शंकरांच्या गळ्यात गुंडाळलेल्या सर्पाला वासुकी म्हणतात, ज्याला सर्पांचा देव मानले जाते. सर्पांचा राजा वासुकी हा शेषनागाचा भाऊ मानला जातो. सर्पांचा देव मानला जाणारा वासुकी, भगवान शिवाचा एक महान भक्त होता. तो शिवाचा प्रिय भक्त आणि सेवक म्हणून ओळखला जातो. समुद्रमंथनावेळी वासुकी नागाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर भगवान शंकरांनी वासुकीला आपल्या गळ्यात स्थान दिले, अशी पुराणकथा सांगितली जाते.
मृत्यूवर विजयाचे प्रतीक
सर्प हा मृत्यू, काळ आणि भीतीचे प्रतीक मानला जातो. भगवान शंकरांनी सर्प गळ्यात धारण करून मृत्यू आणि काळावर विजय मिळवल्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे त्यांना महाकाल असेही संबोधले जाते.
अहंकारावर नियंत्रण
सर्प स्वभावाने विषारी आणि आक्रमक असतो. शिवाने त्याला गळ्यात धारण केले आहे, याचा अर्थ क्रोध, अहंकार आणि नकारात्मक प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे होय. मनुष्यानेही आपल्या वाईट प्रवृत्तीवर संयम ठेवावा, असा संदेश यातून मिळतो.
कुंडलिनी शक्तीचे प्रतीक
योगशास्त्रात सर्प हा कुंडलिनी शक्तीचे प्रतीक मानला जातो. शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत झाल्यावर आत्मज्ञानाची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. भगवान शंकर हे आदियोगी असल्याने सर्प त्यांच्या योगशक्तीचे प्रतीक मानले जाते.
निसर्गाशी एकरूपता
भगवान शंकर हे सर्व जीवांचे रक्षक मानले जातात. सर्पासारख्या भयावह प्राण्यालाही त्यांनी आश्रय दिला. यामधून सर्व सजीवांप्रती समान दृष्टी आणि निसर्गाशी सुसंवाद हा संदेश मिळतो.
विषावर नियंत्रणाचे प्रतीक
समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष भगवान शंकरांनी प्राशन केले. त्यांच्या गळ्यातील सर्प हे विषावर नियंत्रण आणि संकटांना सामोरे जाण्याच्या सामर्थ्याचेही प्रतीक मानले जाते.
आध्यात्मिक संदेश
भगवान शंकरांच्या गळ्यातील सर्प आपल्याला शिकवतो की भीती, राग, अहंकार आणि नकारात्मकता यांवर नियंत्रण मिळवून शांत, संयमी आणि निर्भय जीवन जगावे. शिवाचे हे स्वरूप आत्मसंयम, वैराग्य आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते.
हेही वाचा :
Nag Panchami 2026: नागपंचमीला तव्यावर पोळी, भाकरी का भाजली जात नाही? आजही अनेक ठिकाणी परंपरा, धार्मिक श्रद्धा, लोककथा जाणून थक्क व्हाल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)