Last Updated:
या अपघातात मोहम्मद मुज्जमिल खोकर वय 21 याचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली होती. आता यामध्ये एक नवीन माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबईतील मीरा रोड परिसरात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली होती. मिरारोडच्या जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्समध्ये एका बांधकाम साईटच्या 11 व्या मजल्यावरील क्रेन अचानक कोसळून खाली उभ्या वाहनांवर पडली. या अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला होता. या अपघातात मोहम्मद मुज्जमिल खोकर वय 21 याचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली होती. आता यामध्ये एक नवीन माहिती समोर आली आहे.
जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्सच्या परिसरात आरईआरएस या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात संध्याकाळची आरती झाली होती. त्यात 30 पेक्षा जास्त रहिवासी उपस्थित होते. आरती संपून लोक घरी परतल्यानंतरच क्रेन कोसळली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. यामुळे रहिवाशांनी आम्ही थोडक्यात वाचलो, असं सांगितलं आहे.
जर आरतीच्या वेळी क्रेन कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. स्थानिक नागरिकांनी बांधकाम स्थळावर सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यापूर्वीही तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. वेळीच पावले उचलली असती तर मुज्जमिलचा जीव वाचला असता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी बिल्डर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत संपूर्ण रात्र पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. दोषींवर गुन्ह्यांची नोंद होत नाही तोवर लढा सुरू राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला होता.
Mumbai,Maharashtra
