गेल्या काही काळापासून सोने-चांदीच्या दरात चढ उतार होत आहेत. अशातच आता रिच डॅड, पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा सोने आणि चांदीबाबत मोठा दावा केला आहे. दिग्गज गुंतवणूकदार जिम रॉजर्स यांच्या सल्ल्याचा हवाला देत त्यांनी सांगितले की, ‘येणाऱ्या काळात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मी घसरणीच्या काळात सोने आणि चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. जगभरातील वाढते कर्ज, वाढती महागाई आणि राजकीय नेतृत्वावरील घटता विश्वास यामुळे मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणे हा अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.’
सोने-चांदीचे दर आकाशाला भिडणार
रॉबर्ट कियोसाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, सोने आणि चांदीच्या किमती मोठ्या उंचीवर जाणार आहेत, मात्र त्या दरम्यान मोठ्या चढ-उतारांचाही सामना करावा लागू शकतो. जिम रॉजर्स यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडेच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोने 5,405 डॉलरच्या उच्चांकावरून घसरून 4,006 डॉलरपर्यंत आले, तर चांदी 118 डॉलरवरून 56 डॉलरपर्यंत खाली आली. त्यामुळे ही खरेदीची चांगली संधी आहे.
घसरणीतही खरेदी वाढवली
कियोसाकी यांनी सांगितले की, किमती घसरल्यानंतर मी आणखी जास्त सोने आणि चांदीची खरेदी केली. एका मित्राने मला विचारले की, तुम्ही इतके सोने-चांदी का खरेदी करता? मी म्हटले, जागतिक अर्थव्यवस्था गंभीर संकटात आहे. मला केंद्रीय बँकांवर विश्वास नाही. सोने-चांदीच्या किमती वाढू शकतात, त्यामुळे मी गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे.
गुंतवणूकदारांसाठी काय संदेश?
कियोसाकी यांनी सांगितले की, अनेक लोक किंमत जास्त असताना सोने-चांदी खरेदी करतात आणि कमी किंमत असताना विकतात. तुम्हीही अशीच चूक करणार आहात का? की कमी किमतीत खरेदी करून भविष्यात संपत्ती निर्माण करणार आहात? येणाऱ्या काळात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता.
(टीप – या लेखातील मते ही संबंधित गुंतवणूकदाराची आहेत. टीव्ही 9 मराठी सोने-चांदीत गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)