अनेकदा ग्राहक हा अर्ज भरताना निष्काळजीपणा करतात, एजंटवर आंधळा विश्वास ठेवतात आणि पुढे जाऊन क्लेमच्या वेळी त्यांची मोठी फसवणूक होते किंवा क्लेम नाकारला जातो. विमा घेत असताना ग्राहक म्हणून कोणती काळजी घ्यावी, याविषयी ज्येष्ठ विमा सल्लागार विजय वत्सला अशोक शेडगे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
25 खासगी आणि सरकारी कंपन्यांमध्ये वर्षाहून अधिक काळाचा अनुभव असलेले ज्येष्ठ विमा सल्लागार विजय शेडगे यांनी विमा घेताना कागदपत्र वाचणं का महत्त्वाचं असतं ते सांगितलं आहे. विमा कंपनी तुम्हाला पॉलिसी देणार की नाही, तुमच्याकडून किती प्रीमियम घ्यायचा आणि भविष्यात तुमचा क्लेम मंजूर करायचा की नाकारायचा, हे सर्व काही तुम्ही ‘प्रस्ताव अर्जात’ भरलेल्या माहितीवर अवलंबून असते. त्यामुळे हा अर्ज म्हणजे केवळ एक सरकारी सोपस्कार नसून, तो तुमच्यातील आणि विमा कंपनीमधील एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर करार आहे.
अर्ज भरताना या गोष्टी कधीही लपवू नका
अर्जामध्ये तुमचे वय, वजन, अचूक व्यवसाय आणि तुमचे वार्षिक उत्पन्न यांची अगदी खरी माहिती देणे आवश्यक आहे. या माहितीवरच तुमचा प्रीमियम (विम्याचा हप्ता) आणि तुम्हाला किती रकमेचे विमा संरक्षण (Sum Assured) दिले जाऊ शकते हे निश्चित होते. यासोबतच, तुम्हाला भूतकाळात झालेले लहान-मोठे आजार, झालेल्या शस्त्रक्रिया सध्या शरीरात काही वैद्यकीय तक्रार असल्यास किंवा कोणतीही दीर्घकालीन औषधोपचार सुरू असल्यास त्याची स्पष्ट नोंद करावी.
जर तुम्हाला धूम्रपान, तंबाखू खाणे, गुटखा किंवा मद्यपानाची सवय असेल, तर ती अर्जात प्रामाणिकपणे नमूद करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा प्रीमियम वाढेल या भीतीने ग्राहक ही माहिती लपवतात. परंतु, वैद्यकीय तपासणीत किंवा क्लेमच्या वेळी जर व्यसनाची बाब समोर आली, तर विमा कंपनी थेट माहिती लपवल्याचा ठपका ठेवून क्लेम नाकारू शकते.
तुमच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांना (उदा. आई, वडील, भाऊ, बहीण) काही गंभीर किंवा अनुवांशिक आजार आहेत का, याची माहिती देणे आवश्यक असते. मधुमे, उच्च रक्तदाब , हृदयविकार किंवा कॅन्सर यांसारखे आजार कुटुंबात कोणाला असल्यास विमा कंपनीला त्याची पूर्वकल्पना द्यावी लागते, कारण यावरून तुमच्या आरोग्याचा भविष्यातील धोका मोजला जातो.
तुमच्या नावावर आधीपासूनच दुसऱ्या एखाद्या कंपनीचा आरोग्य किंवा जीवन विमा सुरू असेल, तर त्याचा तपशील नवीन अर्जात देणे बंधनकारक आहे. यामुळे तुमच्या एकूण विमा संरक्षणाची मर्यादा ठरवता येते. यासोबतच, तुमच्या पश्चात विम्याचे पैसे कोणाला मिळावेत, यासाठी नॉमिनीचे (वारसदार) नाव, त्याचे वय आणि तुमच्याशी असलेले अचूक नाते कायदेशीर कागदपत्रांनुसारच अर्जात भरावे.
विमा कंपनी क्लेम पास करण्यापूर्वी तुम्ही अर्जात भरलेली माहिती आणि हॉस्पिटलमधील प्रत्यक्ष परिस्थिती यांची काटेकोर तपासणी करते. जर तुम्ही आधीचा एखादा आजार किंवा व्यसन लपवून ठेवले असेल, तर विमा कंपनी त्याला माहिती लपवणे किंवा चुकीची माहिती देणे मानून तुमचा क्लेम अंशतः किंवा पूर्णपणे नाकारू शकते. अशा वेळी हक्काचे पैसे न मिळाल्याने ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
१. स्वतः अर्ज तपासा: एजंटने किंवा दुसऱ्या कोणीही अर्ज भरला असेल, तरी स्वाक्षरी करण्यापूर्वी प्रत्येक ओळ स्वतः वाचून घ्या.
२. रिकामी जागा सोडू नका: अर्जातील कोणताही कॉलम कोरा ठेवू नका, तिथे योग्य ती माहिती भरा.
३. पारदर्शकता ठेवा: आजार लपवून प्रीमियम कमी येईल हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. पूर्ण प्रामाणिकपणाच तुमचा क्लेम सुरक्षित ठेवेल.
वरिष्ठ विमा सल्लागार, विजय वत्सला अशोक शेडगे
(शासकीय व खाजगी विमा कंपन्यांनासोबतचा २५ वर्षाहून अधिक काळाचा अनुभव)
(डिस्क्लेमर: ही बातमी तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही विमा घेण्याआधी त्याची संपूर्ण माहिती तुमच्या विमा सल्लागाराकडून घ्यावी. विम्याची कागदपत्रे नीट वाचून मगच त्याबाबत आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )