Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रजजवळ असलेल्या इंदोली फाटा इथं मध्यरात्री अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मित्रांमधील पैशातील व्यवहाराच्या वादातून की भाईगिरीच्या गँगवॉरमधून ही घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. संबंधितांनी चार ते पाच गोळ्या झाडल्याचे सांगितले जात असून त्यापैकी दोन गोळ्या जखमीच्या दोन्ही पायात लागलेल्या असून मसूर भागातील जखमी आहे.
पैशाच्या वादातून गोळीबार की भाईगिरीतून गँगवार?
मध्यरात्री झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला. त्यामुळे हा गोळीबार मित्रांतील पैशाच्या वादातून घडला की भाईगिरीत गँगवार घडलं याची चर्चा रंगली आहे. या गोळीबारात चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्याने खळबळ माजली. दोन्ही पायात गोळ्या झाल्याने त्याला उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार
दरम्यान, कोल्हापूर शहरात भरदिवसा गोळीबार करून दहशत माजवणारे दोन्ही आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून (LCB) अवघ्या 12 तासात जेरबंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवून या दोन आरोपींना जयसिंगपूर येथील अंकली पुलाजवळ सापळा रचून अटक केली. हा गोळीबार ‘सुपारी’ देऊन करण्यात आल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नवीन वाशी नाका परिसरात भरदिवसा थरार
मोकावरील आरोपीवर गोळीबार केल्याची घटना 16 जुलै रोजी दुपारी घडली. नवीन वाशी नाका ते फुलेवाडी रिंगरोडवरील ‘स्टार लोकल मार्ट’जवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी मोकावरील आरोपी सूरज साखरेवर गोळीबार केला. सूरज साखरे हा स्वतः पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ‘मोका’ (MCOCA) सारख्या गंभीर गुन्ह्यातून सध्या जामिनावर बाहेर होता. मारेकऱ्यांनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशानेच गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या