लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरप्रकरणावरुन सध्या वातावरण तापलं असून एकीकडे सीबीआयने (CBI) कारवाईचा धडाका लावला असताना दुसरीकडे विद्यार्थी, पालक आंदोलन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील नीट पेपरफुटीवरुन सरकारला जोरदारपणे लक्ष्य केलं आहे. त्यामध्ये, काँग्रेस नेते राहुल गांधींनीही मोदी सरकारवर हल्लाबोल करत शिक्षणव्यवस्था आणि परीक्षा यात सातत्याने होत असलेल्या गैरकारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र केंद्रस्थान बनल्याचं तपासातून पुढे आलं असून लातूरमधील प्राध्यपकासह, क्लासेस चालक आणि एका डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी, सीबीआयकडून आणखी तपास सुरू आहे. याप्रकरणी, आता पहिल्यांदाच आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी भाष्य केलंय.
लातूरमधील आरसीसी क्लासेसचे चालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्यानंतर, त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामध्ये, काँग्रेसच्या राजकीय व्यासपीठावर निवडणूक काळातील भाषण करतानाही त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आपण देशमुख कुटुंबीयांशी एकनिष्ठ असल्याचं, त्यांचं कुंकू लावल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरुन, अनेक राजकीय टीका-टिपण्णी होऊ लागली. तसेच, नीट पेपरफुटीमुळे लातूर पॅटर्नही बदनाम झाल्याची चर्चा राज्यभर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता लातूरचे आमदार तथा माजी मंत्री अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय. अमित देशमुख यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली. याप्रकरणी, सीबीआय तपास योग्य दिशेने सुरू असताना मी टिप्पणी करावी असे अजिबात वाटत नसताना….. असे म्हणत त्यांनी सविस्तरपणे घटनेवर भाष्य केलंय.
व्हायरल व्हिडिओवर भाष्य
याप्रकरणी प्रारंभी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या( NTA) नीट पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले लातूर येथील एक निवृत्त प्राध्यापक आणि त्यानंतर एका शिकवणी क्लासचे मालक, आणि आपल्या पाल्यासाठी पेपर विकत घेणाऱ्यांनांही अटक झाली आहे. दुर्दैवाने त्या अटकेला अनेक जुने संदर्भ जोडण्याचे प्रयत्न काही मंडळींनी केले आहेत. त्यामुळे मी येथे स्पष्ट करू इच्छितो की, जे संदर्भ सामाजिक माध्यमांनी दिले आहेत ते सर्व तथ्यहीन आहेत. भूतकाळात एखाद्याने केलेल्या वक्तव्याचे वर्तमानकाळात संदर्भ जोडणे अजिबात शहाणपणाचे ठरत नाही. ज्यांनी संदर्भ जोडण्याचे प्रयत्न केले आहेत त्यांचा हेतू शुद्ध दिसत नाही, असे म्हणत अमित देशमुख यांनी अप्रत्यक्षपणे मोटेगावकर यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन होत असलेल्या टिकेवरच प्रतिक्रिया दिली आहे.
संवेदनशील प्रसंगात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न
नीट पेपरफुटीत तपास यंत्रणांचे काम गतीने सुरू असताना आणि हे प्रकरण न्याय प्रविष्ट झालेले असताना, मी या संदर्भात टिप्पणी करावी असे मला अजिबात वाटत नव्हते; परंतु ज्या पक्षाचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे, या सरकारच्या काळातच पेपरफुटीचे असंख्य प्रकार घडत आहेत, लाखो विद्यार्थ्यांचे, सुशिक्षीत तरुणांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. अशा परिस्थितीत कोणत्या विषयावर बोलावे आणि न बोलावे याची परिपक्वता नसलेले सत्ताधारी पक्षाचेच उथळ पुढारी अशा संवेदनशील प्रसंगात राजकीय पोळी भाजण्यासाठी संदर्भहीन वक्तव्य करू लागले आहेत. खरे तर त्यांचीच वक्तव्ये आता संशयास्पद वाटावीत अशी माहिती पुढे येत आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकारी व्यवस्थेला त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने करू देणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने तपास झाला तर सर्व तथ्ये बाहेर येणार आहेत, त्यावर पुढे न्यायव्यवस्था आहे, तेथे दोषी मंडळींना नक्की शिक्षा होणार आहे. तोपर्यंत धीर धरण्याचा शहाणपणा सर्वांनीच बाळगायला हवा, असेही अमित देशमुख यांनी म्हटले.
हेही वाचा
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
आणखी वाचा