शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का? Image Credit source: टीव्ही 9 मराठी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात रविवारी पक्षातील खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला प्रत्यक्षात 4 खासदारच उपस्थित होते, तर 5 खासदार हे ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा केला जात होता, तेव्हापासूनच राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर 6 खासदारांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान त्यानंतर गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहावं यासाठी सर्व खासदारांसाठी व्हीप लागू करण्यात आला होता, मात्र तरी देखील 6 खासदारांनी या बैठकीला दांडी मारली.
दरम्यान हे सर्व बंडखोर खासदार आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. लवकरच या खासदारांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र आता या सर्व घडामोडी घडत असताना एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सनसनाटी दावा केला आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे. कदम यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा सातवा खासदारही फुटला आहे, तो मंत्रिपदाची मागणी करत होता, असा दावा कदम यांनी केला आहे, कदम यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, एवढंच नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा देखील कदम यांनी केला आहे. 2029 पर्यंत शिवसेना ठाकरे गटात आमदार देखील उरणार नाहीत, असा हल्लाबोल देखील यावेळी कदम यांनी केला आहे. दरम्यान कदम यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तो सातवा खासदार नेमका कोण? याची आता चर्चा सुरू झाली आहे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, 6 आमदार फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.