Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवड शहरावर अखेर जलसंकटाची (Water Crisis) मोठी कुऱ्हाड कोसळली आहे. वाढत्या उन्हामुळे आणि ‘एल-निनो’च्या (El-Nino) प्रभावामुळे पाऊस लांबणीवर गेल्याने शहरात 15 टक्के पाणी कपात (Water Cut) लागू करण्यात आली आहे. या पाणी कपातीची अधिकृत अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे. शहराची जीवनदायिनी असणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने आटल्याने पाटबंधारे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला थेट धरणातून मिळणाऱ्या पाणी साठ्यात 15 टक्के कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
Pimpri Chinchwad Water Cut: धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर
शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा (Water Stock) आता अवघ्या १९ टक्क्यांवर खाली आला आहे. तर दुसरीकडे, चिखली आणि समाविष्ट भागाला पाणी पुरवणाऱ्या आंद्रा धरणातील पाणीसाठाही घटला आहे. प्रचंड उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन (Evaporation) होत असून धरणाचे पात्र कोरडे पडू लागले आहे. सध्या उपलब्ध असलेला हा पाणीसाठा जास्तीत जास्त 31 जुलैपर्यंतच पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Pimpri Chinchwad Water Cut: उद्यापासून थेट धरणातून पाणी कपात
पिंपरी-चिंचवड महापालिका दररोज पवना धरणातून रावेत येथील जल उपसा केंद्राद्वारे (Water Pumping Station) सुमारे 500 एमएलडी अशुद्ध पाणी उचलते. या पाण्यावर निगडी प्राधिकरणातील सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात (Water Treatment Plant) प्रक्रिया करून संपूर्ण शहराला पुरवठा केला जातो. तसेच आंद्रा धरणातून निघोजे बंधारा येथून दररोज 90 दशलक्ष लिटर पाणी उचलून चिखली प्रकल्पात शुद्ध केले जाते. मात्र, आता थेट धरणातूनच 15 टक्के कपात होणार असल्याने शहरात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी घट होणार आहे.
Pimpri Chinchwad Water Cut: पाण्याचं संकट गडद
पिंपरी-चिंचवड शहरात आधीच 2018 पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिक आधीच विस्कळीत पाणीपुरवठ्याने हैराण आहेत. त्यातच आता धरणातील पाणीसाठा आटल्याने आणि पाटबंधारे विभागाच्या नवीन आदेशांमुळे शहरवासीयांचे हाल अधिक वाढणार आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं