Last Updated:
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, वसई रेल्वे स्थानकावर एक लोकल ट्रेन उभी आहे. त्याच वेळी लोकलच्या शेजारील ट्रॅकवरून एक मेल-एक्स्प्रेस अत्यंत सुसाट वेगाने पुढे जात आहे.
मुंबई लोकलमधून प्रवास करताना अनेकदा प्रवासी घाईघाईत किंवा निष्काळजीपणामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालतात. पण, आता मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील वसई स्थानकावरून एक अत्यंत भयंकर आणि अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे.
एका बाजूने धावती मेल-एक्स्प्रेस अत्यंत वेगाने ट्रॅकवरून येत असताना, एका व्यक्तीने चक्क थांबलेल्या लोकलच्या दरवाजातून थेट रुळावर उडी मारली. मृत्यू समोर उभा असतानाही घेतलेला हा जीवघेणा धोका कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, वसई रेल्वे स्थानकावर एक लोकल ट्रेन उभी आहे. त्याच वेळी लोकलच्या शेजारील ट्रॅकवरून एक मेल-एक्स्प्रेस अत्यंत सुसाट वेगाने पुढे जात आहे. अशा अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक परिस्थितीत, एका प्रवाशाने लोकलच्या दरवाजातून थेट खाली रेल्वे रुळावर उडी मारली.
समोरून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसचा वेग एवढा प्रचंड होता की, जर त्या व्यक्तीचा पाय घसरला असता किंवा तो काही सेकंद जरी अडखळला असता, तर त्याचा जागीच छिन्नविच्छिन्न होऊन मृत्यू झाला असता. हा थरार पाहून रेल्वे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.
व्हिडिओ व्हायरल: हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच नेटकऱ्यांमधून या मूर्खपणाच्या स्टंटवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “अशा लोकांमुळे रेल्वे प्रवाशांची बदनामी होते आणि कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागतो,” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या धक्कादायक प्रकारानंतर रेल्वे पोलिसांच्या सुरक्षेवर आणि गस्तीवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानकांवर अशा रीतीने जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि ही घटना नेमकी कधी घडली, याचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जात आहे. व्हिडिओमधील व्यक्तीची ओळख पटवून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
रेल्वे रुळ ओलांडणे किंवा धावत्या गाड्यांसमोर असे जीवघेणे स्टंट करणे हा गंभीर गुन्हा असून, तो थेट तुमच्या जीवावर बेतू शकतो. रेल्वे प्रवाशांनी नेहमी फूट ओव्हर ब्रिजचा वापर करावा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Mumbai,Maharashtra
