Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस’! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं


Jayant Patil: सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांचे पद रद्द करण्याच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी काल (16 जुलै) मलगुंडे बंधूंसह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीबाबत स्वतः जयंत पाटील यांनी ट्विट (X) करून सविस्तर माहिती दिली आहे.

जुने प्रकरण पुढे करून पद रद्द; जयंत पाटलांची शिंदेंकडे धाव

जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझ्या ईश्वरपूर मतदारसंघातील उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे तब्बल 7 हजार 200 मताधिक्याने जनतेतून थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी ईश्वरपूर शहरातील अनेक प्रलंबित आणि विधायक विकासकामांना गती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत.” “मात्र, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांचे कुठलेतरी जुने अतिक्रमणाचे प्रकरण पुढे आणून त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवक पद रद्द ठरवण्यात आले आहे. हा निर्णय लोकभावनेचा आदर करणारा नाही. त्यामुळे या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आणि वस्तुस्थिती सरकारसमोर मांडण्यासाठी मी स्वतः आनंदराव मलगुंडे व सुनील मलगुंडे यांच्या समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.  

महायुतीमधील नेत्यांच्या भेटीचा सिलसिला

मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड भेट घेतली होती. याच वेळी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील फडणवीसांना भेटायला पोहोचल्याने राजकीय भूवया उंचावल्या होत्या. फडणवीस यांच्या भेटीच्या अवघ्या काही दिवस आधी जयंत पाटील यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांचीही मुंबईत भेट घेतली होती. एकाच आठवड्यात भाजपच्या दोन अत्यंत वजनदार नेत्यांची (पहिले विनोद तावडे आणि नंतर देवेंद्र फडणवीस) जयंत पाटील यांनी घेतलेली भेट ही केवळ योगायोग मानली जात नाही. अजित पवार गटातील नेत्यांसोबत जयंत पाटील यांच्या थेट औपचारिक बैठका झालेल्या नसली, तरी विधानभवनातील एका खोलीत अजित पवार गटाच्या काही आमदारांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याची मोठी चर्चा झाली होती.

शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होण्याची चर्चा आहे. मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाला पाठिंबा देण्याचे सुतोवाच पक्षाकडून करण्यात आले आहेत. दुसरीकडे, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असलेल्या जयंत पाटलांच्या भेटीगाठी पाहता एनडीएसोबत जाण्याच्या चर्चेला आणखी बळकटी मिळाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *