Last Updated:
मध्य रेल्वेने दक्षिण-पूर्व डाऊन मार्गिका यशस्वीरित्या कार्यान्वित केल्याने आता पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे: लोणावळा-कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर विस्कळित झालेल्या रेल्वे वाहतुकीबाबत अखेर अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला कर्जत-लोणावळा दरम्यानचा रेल्वे मार्ग रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून पुन्हा सुरू केला आहे. मध्य रेल्वेने दक्षिण-पूर्व डाऊन मार्गिका यशस्वीरित्या कार्यान्वित केल्याने आता पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी ७ जुलै रोजी घाटातील मध्य मार्गिका सुरू करण्यात आली होती. आता दक्षिण-पूर्व डाऊन मार्गिकाही सुरू झाल्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील घाट विभागातील दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या झाल्या आहेत. यामुळे वळवून चालवल्या जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आता पुन्हा एकदा त्यांच्या मूळ आणि नियोजित मार्गाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलैपासून बेंगळूरू-सीएसएमटी उद्यान एक्सप्रेस आणि सोलापूर-सीएसएमटी सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाड्या पूर्ववत सीएसएमटी (CSMT) पर्यंत धावतील.
१८ जुलैपासून सीएसएमटी-बेंगळूरू उद्यान एक्सप्रेस, सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस; तसेच यापूर्वी रद्द करण्यात आलेली सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस पुन्हा नियमित मार्गावर सुरू होईल.
१९ जुलैपासून कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेसही पूर्ववत आपल्या मूळ मार्गाने धावेल.
घाटात झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे सेवा पूर्ववत करणे हे मोठे आव्हान होते. घाट विभागातील उर्वरित मार्गिका आणि इतर दुरुस्तीची कामे अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहेत. रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वेचे शेकडो कर्मचारी चोवीस तास घटनास्थळी कार्यरत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Pune,Maharashtra
मुंबई-पुणे प्रवाशांसाठी गुड न्यूज! मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा ‘ट्रॅक’वर, पाहा कधीपासून धावणार कोणत्या ट्रेन ?
