नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात ‘रामरक्षा’ आंदोलन सुरू आहे. येत्या 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनात सहभागी होण्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. परंतु आता या पत्रावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री नितेश राणे यांनी देखील एक पत्र लिहून संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी हे पत्र ट्विटरला शेअर केलं आहे.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
‘प्रति मा. संजय राऊतजी, आमचे नेते मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिताना आपण तर कहरच केला. प्रभू श्रीरामाच्या सुरक्षेपर्यंत जाऊन पोहोचला. जे प्रभू श्रीराम सर्वांची सुरक्षा करतात, त्यांची सुरक्षा आपण केव्हापासून करायला लागला? रामरक्षा पाठ असणे तर दूर, पुस्तकात पाहूनही रामरक्षेची दोन पानं आपला नेता धड वाचू शकत नाही आणि निघाले मा. देवेंद्रजींना सल्ला द्यायला…लाज वाटायला पाहिजे.
जर तुम्हाला काही करायचे असेल तर रामाच्या नावाने राजकारण बंद करा. अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात काडीचा सहभाग तुमचा नव्हता. ना उद्धव ठाकरेजी सहभागी झाले होते. ज्या कार्यकर्त्यांनी लाठी, गोळ्या खाऊन तुमच्या आजच्या सहकारी काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलने केली आणि हा ऐतिहासिक लढा जिंकला, त्या अनेक पिढ्यांपैकी एक मा. देवेंद्रजी आहेत. तिन्ही कारसेवांना उपस्थित राहणारे आमचे नेते मा. देवेंद्रजी आहेत. रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या मांडीवर बसून पुळका दाखवू नका, किमान रामाच्या नावाने राजकारण करू नका, नागपुरात चाललेच आहात, तर संघभूमीवर नाक रगडून आतापर्यंत केलेल्या पापांची माफी मागा..डर्टी संजय राऊत..’ असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटलं होतं?
‘प्रति मा. श्री देवेंद्र फडणवीसजी जय महाराष्ट्र, आपण एक प्रखर रामभक्त आणि कडवट हिंदुत्ववादी आहात. अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचे आपण नेहमी सांगता. आपल्यासारख्या लाखो राम भक्तांच्या संघर्षातून राम जन्मभूमी मुक्त झाली व अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले. याच राम मंदिरात चोरी, लुटमार, फसवणूक असे गुन्हे घडत आहेत व शेकडो कोटींचा अपहार झाला. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील चोरीबाबत शोक व्यक्त केला. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या राम मंदिर लुटीबाबत लोकांत जागृती आणण्यासाठी ‘रामरक्षा’ उपक्रम सुरू केला, रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्या. दिनांक 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेचार वाजता राम मंदिर- रामनगर, नागपूर येथे ‘रामरक्षा’ उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होत आहे, सदर कार्यक्रम नागपुरात होत असल्याने आपण या ‘रामरक्षा’ उपक्रमात आवर्जुन सहभागी होऊन राम भक्तांना शुभेच्छा द्याव्यात, ही आग्रहाची विनंती’ असं पत्र संजय राऊत यांनी फडणवीस यांना लिहिलं आहे.’