पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय – Marathi News | Who will look after daughter jija adinath kothare urmila kanetkar divorce post mahesh kothare granddaughter


उर्मिला कानेटकर, आदिनाथ कोठारेImage Credit source: Instagram

घटस्फोटांचं वाढतं प्रमाण हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. 15 ते 20 वर्षे संसार केल्यानंतर काही जोडपी विभक्त होत आहेत, तर काहींचा संसार काही महिनेही टिकत नाहीये. जेव्हा सेलिब्रिटींच्या बाबतीत असं काही वृत्त समोर येतं, तेव्हा पुन्हा एकदा हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चत येतो. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय मानली जाणारी जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी अखेर घटस्फोट जाहीर केला आहे. गेल्या काही काळापासून या दोघांच्या विभक्त होण्याची कुजबुज दबक्या आवाजात सुरू होती. त्यावर आता दोघांनी शिक्कामोर्तब करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. त्याचसोबत दोघांनी त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीबाबतचा मोठा निर्णयसुद्धा सांगितला आहे.

आदिनाथ आणि उर्मिला यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. उर्मिलाला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. या प्रेमाचं लग्नात तर रुपांतर झालं. मात्र त्याचा शेवट घटस्फोटात होईल याची कल्पना कोणीच केली नसेल. घटस्फोटाचं नेमकं कारण या दोघांनी सांगितलं नाही. पण ‘चंद्रमुखी’ या चित्रपटापासूनच दोघांमधील दुराव्याची चर्चा होऊ लागली होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा असो किंवा इतर कोणताही क्षणी.. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांबद्दल काहीही पोस्ट करणं बंद केलं होतं. घटस्फोट हा कधीच कोणासाठी सोपा नसतो. त्यामुळे खूप विचार केल्यानंतर एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने वेगळं होत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलं.

आदिनाथ आणि उर्मिलाची पोस्ट-

घटस्फोटानंतर लेक जिजाचं काय होणार, तिचं संगोपन कोण करणार, याविषयीही दोघांनी मिळून निर्णय घेतला आहे. आठ वर्षांच्या जिजासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत, असं त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला तरी मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत, ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळाला, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन करत आहोत, असं आदिनाथ आणि उर्मिलाने स्पष्ट केलं.

घटस्फोट घेताना अपत्य कोणासोबत राहणार याबाबत मिळून विचार केला जातो आणि तसा निर्णय घेतला जातो. आई आणि वडील दोघांना मिळूनही त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं संगोपन करता येतं. अशा केसेसमध्ये मुलगा किंवा मुलगी परिस्थितीनुसार कायमची तिच्या आईकडे किंवा वडिलांकडे किंवा ठराविक दिवसांनी दोघांकडे राहायला असतात. मात्र अनेक महत्त्वाच्या प्रसंगी, शाळा-कॉलेजच्या बाबतीत किंवा इतर खास प्रसंगी आई आणि वडील दोघं एकत्र येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतात. जिजाला आई आणि वडील या दोघांचं प्रेम मिळालं यासाठी तिचं एकत्र संगोपन म्हणजेच को-पॅरेंटिंग करण्याचा निर्णय आदिनाथ आणि उर्मिलाने घेतला आहे. जिजा लहानपणापासूनच नेटकऱ्यांच्या परिचयाची आहे, कारण आदिनाथ आणि उर्मिला यांनी अनेकदा तिच्यासोबत फोटो, व्हिडीओ, रील्स पोस्ट केले आहेत.

घटस्फोट आणि त्यासंबंधी यापुढे कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचसोबत नेटकऱ्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, म्हणून दोघांनीही पोस्टवरील कमेंट्स ‘म्यूट’ (बंद) केले आहेत. म्हणजेच या पोस्टवर कोणीच कमेंट करू शकणार नाही.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *