Pandharpur Vitthal Mandir VIP Darshan : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांना झटपट आणि सुलभ दर्शन मिळावे, याकरिता 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या नव्या नियमाचा फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री मात्र लवाजम्यासह दर्शन घेऊन गेल्याने व्हीआयपी दर्शन बंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचं चित्र आहे.
सुधीर मुनगंटीवार हे आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसह विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिल्यानंतरच आपण येथे आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा प्रचंड अभाव दिसून आला. मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला दर्शनासाठी आत सोडण्यात आले, मात्र त्यांच्यासोबत आलेल्या मित्र आणि नातेवाईकांना व्हीआयपी गेटवरच बराच वेळ ताटकळत ठेवण्यात आले आणि शेवटी बाहेरच थांबवण्यात आले. या प्रकारामुळे मुनगंटीवार यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Sudhir Mungantiwar Angry : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कडाडले
या संपूर्ण प्रकारानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. ते म्हणाले की, “जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिले म्हणून मी आलो होतो. जर प्रशासनाने व्हीआयपी बंदीबाबत आधीच स्पष्ट कल्पना दिली असती, तर आम्ही दोन महिन्यांनंतर दर्शनाला आलो असतो. असं करण्यापेक्षा आधीच सांगायला हवं होतं.” मंदिरात महसूल विभाग आणि मंदिर प्रशासनाचा ताळमेळ नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
Gulabrao Patil Vitthal Mandir VIP Darshan : गुलाबराव पाटील लवाजम्यासह मंदिरात
एकीकडे सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईकांना गेटवर रोखण्यात आलेले असताना, काही वेळातच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या मोठ्या लवाजम्यासह मंदिरात दाखल झाले. विशेष म्हणजे, गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या लोकांना मंदिरात सोडण्यात आलं. याबाबत विचारलं असता, गुलाबराव पाटील यांनी आपल्यासोबतच्या लोकांना आत सोडल्याची कबुली दिली. आपण मंत्री असल्याने जबाबदारी जास्त आहे, म्हणूनच 12 तास प्रवास करून आलो असल्याचं त्यांनी सांगितले.
Vitthal Mandir Administration VIP Darshan : मंदिर प्रशासनाच्या दुजाभावामुळे चर्चांना उधाण
सर्वसामान्यांसाठी लागू केलेल्या नियमात पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधींमध्येच दुजाभाव पाहायला मिळाल्याने मंदिर प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. राज्याचे मंत्री आणि आमदारांची गर्दी अशीच सुरू राहिल्यास सर्वसामान्यांना कधी दर्शन मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आधीच राजकीय वर्तुळात अनेक कारणांमुळे नाराज असलेल्या मुनगंटीवार यांना पंढरपुरात मिळालेल्या या वागणुकीमुळे ते आणखीनच नाराज झाल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा:
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?