Last Updated:
मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच येथील चिमणीचा काही भाग अचानक पत्त्यासारखा कोसळल्याने एकच खळबळ उडाली
ठाणे : मीरा रोड येथील मुख्य स्मशानभूमीत एक धक्कादायक घटना घडली आहे. स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच येथील चिमणीचा काही भाग अचानक पत्त्यासारखा कोसळल्याने एकच खळबळ उडाली. अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु महापालिकेच्या भोंगळ आणि निष्काळजी कारभाराचे वाभाडे पुन्हा एकदा वेशीवर टांगले गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील स्मशानभूमीत नेहमीप्रमाणे अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होती. नातेवाईक आणि नागरिक उपस्थित असतानाच अचानक स्मशानभूमीच्या चिमणीचा वरचा काही भाग मोठ्या आवाजासह खाली कोसळला. सुदैवाने चिमणीचा हा भाग उपस्थित नागरिकांच्या अंगावर न पडल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. मात्र, या दुर्घटनेमुळे महापालिकेच्या देखभालीवर आणि बांधकामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजकारण तापले; मनसेनंतर शिवसेनेचा हल्लाबोल
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पातळीवर तीव्र संताप व्यक्त होत असून राजकीय वातावरणही तापले आहे. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता शिवसेनाही या प्रकरणी पूर्णपणे आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या पालिका प्रशासनाला धारेवर धरत शिवसेनेने थेट पालिका आयुक्तांकडे आणि संबंधित विभागाकडे कारवाईची मागणी केली आहे.
शिवसेना आक्रमक
स्मशानभूमीसाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी तसेत मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील सर्व स्मशानभूमींचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आज एक मोठा अनर्थ घडता घडता राहिला आहे.
पालिका तात्काळ काय पावले उचलणार?
प्रशासनाने आमच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत आणि दोषींवर कारवाई करून स्मशानभूमीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही, तर शिवसेना संपूर्ण मीरा-भाईंदर शहरात महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. या घटनेमुळे आता मीरा-भाईंदर महापालिका प्रशासन बॅकफूटवर आले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालिका तात्काळ काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :
Mumbai,Maharashtra
