Shubhman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?


नवी दिल्ली : आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं रँकिंग जाहीर केलं जातं. आयसीसीकडून नियमितपणे कसोटी, वनडे आणि टी 20 मधील रँकिंग जाहीर केलं जातं.  यामध्ये फलंदाज, गोलंदाज , ऑलराऊंडरचं रँकिंग स्वतंत्रपणे जाहीर केलं जातं. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पार पडल्यानंतर आयसीसीकडून नव्यानं रँकिंग जाहीर केलं आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिल वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानाच्या जवळ पोहोचला आहे. 

शुभमन गिल यानं बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत 80 धावांची दमदार खेळी केली. गिलच्या फलंदाजीमुळं भारताच्या विजयाचा रचला गेला. आयसीसी वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये गिल सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, तो पहिल्या स्थानाच्या जवळ पोहोचला आहे. आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर  न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल आहे. मात्र, मिशेल आणि शुभमन गिल यांच्या रेटिंगमध्ये फार अंतर नाही.

गिलकडे पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी

नव्या रँकिंगनुसार डॅरिल मिशेल 814 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. तर, शुभमन गिल 803 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. गिल आणि मिशेल या दोघांमध्ये 11 रेटिंगचं अंतर आहे. शुभमन गिल यानं इंग्लंड विरोधातील दुसऱ्या वनडेमध्ये दमदार कामगिरी केल्यास तो आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचू शकतो. आयसीसीच्या वनडेच्या नव्या रँकिंगमध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानावर तर रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानी अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान, सहाव्या स्थानी वेस्ट इंडिजचा शाई होप, सातव्या स्थानावर बाबर आझम आहे. आठव्या स्थानी आयरलँडचा हॅरी टॅक्टर, श्रीलंकेचा चरिथ असालंका नवव्या आणि कुसल मेंडिस दहाव्या क्रमांकावर आहे.  

गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर अफगाणिस्तानचा राशिद खान, दुसऱ्या स्थानी अबरार अहमद, तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज, चौथ्या स्थानी इंग्लंडचा जोफ्रा आर्चर, पाचव्या स्थानी श्रीलंकेचा महिश तिक्षाणा, इंग्लंडचा आदिल रशीद सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा मिशेल सँटनर सातव्या, भारताचा कुलदीप यादव आठव्या, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी नवव्या तर बांगलादेशचा हसन मिराज 10 व्या स्थानावर आहे. 

दुसरीकडे पहिल्या वनडेमध्ये 4 विकेट आणि नाबाद 57 धावांची खेळी करणाऱ्या अक्षर पटेलनं देखील रॅकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. अक्षर पटेल गोलंदाजी रँकिंगमध्ये 42 व्या स्थानावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या रँकिंगमध्ये 73 व्या स्थानी अक्षर पटेल पोहोचला आहे. तर, ऑलराऊंडच्या यादीत अक्षर पटेल टॉप 10 मध्ये पोहोचला असून तो नवव्या स्थानावर पोहोचला आहे. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *