नवी दिल्ली : थ्री इंडियट चित्रपटात आमीर खानने ज्यांची भूमिका साकारली ते सोनम वांगचुक (Sonam wangchuk) थ्री इडियट चित्रपटाच्या माध्यमातून देशाच्या घराघरात पोहोचले आहेत. तर, रॅमन मॅगसेसे पुरस्कार पटकावल्याने त्यांचं कार्य देखील देशाला परिचीत आहे. मात्र, देशात झालेल्या नीट पेपर फुटीच्या घटनेविरोधात शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सध्या दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर त्यांचं आमरण उपोषण (Agitation) सुरू आहे. गेल्या 18 दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या 18 दिवसात त्याचं वजन 8 किलोहून अधिक कमी झालं आहे. मात्र, सरकारने अद्याप कुठलीही दखल न घेतल्याने आता हे आंदोलन थेट कोर्टात (Court) पोहोचलं आहे.
सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीही सोनम वांगचूक यांना फोन करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच, अनेकांकडून वांगचूक यांच्या प्रकतीची काळजी व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे. तर, दिल्लीतील वकील राकेश कुमार सैनी यांनी वांगचूक यांनी उपोषण सोडावं म्हणून जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत वांगचुक यांचा ‘जीव वाचवण्यासाठी सरकारकडून तातडीनं दखल’ घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. आता, न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारला नोटस बजावली आहे.
काय म्हटलंय याचिकेत?
सोनम वांगचुक यांच्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचार, जीवनरक्षक मदत आणि आवश्यक पोषण पुरवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली. त्यासोबतच सरकारने त्यांच्या आंदोलकांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू करावी, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असतो, तेव्हा सरकार गप्प बसू शकत नाही. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे किंवा उपोषण करणे हा नागरिकांचा अधिकार आहे, परंतु त्याचवेळी आपल्या नागरिकांचा जीव वाचवणे ही सरकारचीही जबाबदारी आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.
न्यायालयाने मागितले उत्तर
दरम्यान, दाखल याचिकेवर न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागितलं असून न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत उद्या याप्रकरणाची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले असून सरकार उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेणार का, त्यांच्याशी चर्चा करणार का हे पाहावे लागेल.
हेही वाचा
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?