Another Birth Movie: मध्य आशियातील ताजिकिस्तानातून सर्वाधिक स्थलांतर होतं. तिथली भौगोलिक स्थिती याला जबाबदार आहे. तरुणांना कामाची संधी उपलब्ध नाही. मग हे लोक रशिया, युरोप किंवा अमेरिकेत जातात. स्थलांतरित नागरिकांनी पाठवलेल्या पैशावर ताजिकिस्तानचा कारभार चालतो. देशाच्या एकूण उत्पन्नात याचे प्रमाण जवळपास 30 ते 50 टक्के इतके आहे. ताजिकिस्तानातून रशियात जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. शिवाय शेती आणि इतर औद्योगिक कामाच्या हंगामात इथले पाच लाखांहून अधिक नागरिक स्थलांतरित होतात. यामुळे इथल्या गावांमध्ये फक्त महिला, लहान मुले आणि म्हातारी माणसेच बाकी उरतात. अशाच एका गावाची गोष्ट दिग्दर्शिका इसाबेल कलंदर आपल्या ‘अनदर बर्थ’ (2025) या चित्रपटातून सांगते.
इसाबेल स्वतः ताजिकिस्तानातून स्थलांतरित झालेय. आता ती अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात राहते. वयात येत असतानाच तिने ताजिकिस्तान सोडलं. कमावते पुरुष घर सोडून जातात आणि मागे राहिलेल्यांचे काय हाल होतात, हे इसाबेलने जवळून पाहिलंय. जेहा ती अमेरिकेत सिनेमाचे शिक्षण घेत होती, तेव्हाच यावर चित्रपट बनवायचे तिने ठरवले होते.
स्थलांतर या विषयाभोवती ती चित्रपट त्रयी (ट्रायलॉजी) तयार करणारेय. यातला पहिला चित्रपट अनदर बर्थ (2025) हा 30व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (दक्षिण कोरिया, 2025) जगप्रथम प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये फिरल्यानंतर नुकत्याच किर्गिजस्तानमध्ये झालेल्या चौथ्या बिश्केक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘अनदर बर्थ’ला महत्त्वाचे तीन पुरस्कार मिळाले. यात फिप्रेस्की (FIPRESCI) या आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटनेतर्फे दिला गेलेला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पुरस्काराचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर इसाबेलला Exile Trilogy – स्थलांतरित चित्रपटांमध्ये दुसऱ्या फिल्म फंडिंगही मिळालंय.
ताजिकिस्तान- स्थलांतर आणि त्याचे साइड इफेक्ट्स
इसाबेल कलंदरचा अनदर बर्थ (2025)हा ताजिकिस्तानच्या शकधरा खोऱ्यातील तिच्या आजोळी शूट झालाय… गोष्ट एकदम साधी आहे. गावातील सर्व तरुण पुरुष कमवण्यासाठी परदेशात गेलेत. त्यामुळे बायका, मुले आणि म्हातारी मंडळीच फक्त गावात उरलीत. तरुण बायका घरचा कारभार चालवत आहेत. मुलं मोठी होतायत पण त्यांनी वडिलांना प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही. वडिलांचा चेहरा फक्त घरातल्या फोटोतच दिसतो. घरचे म्हातारे एकटे आहेत, बिछान्यावर आहेत आणि मुलाची वाट पाहतायत. सर्वात कठीण परिस्थिती इथल्या तरुण महिलांची आहे. नवरा घर सोडून गेलाय. आता घरची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे, मुलं, सासू-सासऱ्यांना सांभाळायचे. नवऱ्याशी अनेक महिने संवाद होत नाही. मग तिच्या मनातली गोष्ट ती कुणाला सांगणार?
सिनेमातील मुख्य नायिका आहे आठ वर्षांची परुस्तु. तिचे आजोबा शेवटच्या घटका मोजत आहेत. म्हणून ती आपल्या परदेशात गेलेल्या वडिलांना शोधायला निघालीय. यासाठी ती आपल्या कल्पनेतील परीची मदत घेणारेय. परी सर्व ठीक करते. तिला सर्व माहित असतं. ती सर्वांना मदत करते, मग आपल्या वडिलांनाही शोधून काढेल, असा तिला विश्वास आहे.
स्थलांतर आणि महिला
परुस्तुची आई परवीन एकटी आहे. गावातल्या सर्व बायकांची स्थिती अशीच आहे. त्याही अशाच एकट्या आहेत. वरवर पाहता महिलांना इथं सर्व अधिकार आहेत, पण ते केवळ परिस्थितीने दिलेले ‘महिला सशक्तीकरण’ आहे. अनेकदा स्थलांतरित झालेले नवरे परत येतच नाहीत. तिथेच नवा संसार थाटतात. फक्त पैसे पाठवत राहतात. संवाद कमी झाला की बायकोला ते समजते. मग ती आणखी कोषात जाते, एकटी बनते. परवीनची स्थितीही अशीच आहे.
परवीनचा एकाकीपणाची भीषणता दाखवण्यासाठी इसाबेलने फुरूघ फर्रुखझाद (1935-1967) यांच्या कवितेचा आधार घेतलाय. घराचा एक अडगळीचा कोपरा आहे, तिथे परवीन या कवितेशी एकरूप होते. त्यातील एक कविता ती परुस्तुलाही पाठ करायला देते. सिनेमात फुरूघच्या दोन कविता तिने वापरल्या आहेत:
I Pity the Garden
(मी बागेवर दया करते)
कोणीही फुलांचा विचार करत नाही.
कोणीही माशांचा विचार करत नाही.
कोणीही विश्वास ठेवू इच्छित नाही की बाग मरत चालली आहे,
की या उन्हाच्या प्रखर उष्णतेत तिचे हृदय सुजले आहे,
की तिची मनःशक्ती हळूहळू कोमेजत चालली आहे
तिच्या हिरव्यागार, समृद्ध स्मृतींमधून…
सिनेमात या ओळी आई परवीनच्या तोंडी आहेत. पुरुषांच्या स्थलांतरामुळे घरात राहिलेल्या स्त्रियांच्या एकटेपणा आणि त्यांच्या आजूबाजूच्या जगाच्या उदासीनतेचे चित्रण होतं…
Let Us Believe in the Dawn of the Cold Season
(थंड हंगामाच्या सुरुवातीवर विश्वास ठेवू या)
मी थंड आहे,
मी थंड आहे, आणि असं वाटतंय की
मी पुन्हा कधीही उबदार होणार नाही…
मी थंड आहे आणि मला माहिती आहे की
एक दिवस
एक वन्य पोप्पीच्या सर्व लाल स्वप्नांमधून
काही थेंब रक्ताशिवाय काहीही उरणार नाही…
फुरूघ या कवितेत प्रेम, वेदना आणि आशेचा मिलाफ दाखवतात. ‘थंड हंगाम’ म्हणजे जीवनातील कठीण काळ, तरीही त्याच्या शेवटी पहाट येईल असा विश्वास ठेवण्याचे आवाहन आहे.
फुरूघ फर्रुखझाद कोण आहेत?
फुरूघ फर्रुखझाद या इराणमधील महत्त्वाच्या कवयित्री होत्या. अवघ्या 32 व्या वर्षी अपघातात त्या वारल्या. इराणच्या फेमिनिस्ट चळवळीत त्यांच्या कवितेचे योगदान मोठे आहे. 17 व्या वर्षी त्यांचे लग्न झालं. वर्षभरात मुलगा झाला. नवऱ्याशी पटले नाही. घटस्फोट घेतला. लहानपणापासूनच त्यांना कवितेची आवड होती. त्यांना स्वतंत्र जगायचे होते. नवऱ्याकडे मुलगा सोपवून त्या घराबाहेर पडल्या. इराणसारख्या देशात 1950 च्या दशकात हे करणे क्रांतीकारी होते. पुढे त्या युरोपात गेल्या. तिथे अनेक पुरुषांशी त्यांचा संबंध आला. SIN (पाप) या कवितेत त्यांनी हे स्पष्ट केलंच आहे. घटस्फोटित एकाकी स्त्रीच्या भावनांना त्यांनी कवितेच्या माध्यमातून हात घातला. जगभरात फुरूघ आणि त्यांच्या कवितांचे लाखो-करोडो चाहते आहेत. स्त्रीवादाच्या माध्यमातून फुरूघच्या कवितांचा अभ्यास झाला आहे.
Life Says: Still We Must Live – दोहा फिल्म इन्स्टिट्यूटसोबत काम करताना इसाबेलनं पहिल्यांदा फुरूघची कविता वाचली. ती भावली आणि मग यावरच आपला सिनेमा बनवण्याचे तिनं ठरवलं. या पहिल्या सिनेमाला त्यांनी फुरूघच्या कवितेतूनच नाव दिलंय.
एक्झाइल ट्रिलॉजी (Exile Trilogy) अर्थात स्थलांतरित सिनेमाचा दुसरा भाग Life Says: Still We Must Live वर सध्या काम सुरूय. हा सिनेमा स्थलांतर करून परत आलेल्या एका तरुणाची गोष्ट सांगतो. परत आल्यानंतर त्याला अपयशी वाटते. जगाला तोंड दाखवायला लाज वाटते. यामुळे तो एकलकोंडा झाला आहे. गावात फिरकतही नाही.