Mumbai : ‘विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?’ चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!


मुंबई : चेंबूर येथील दुर्घटनेत एका निष्पाप चिमुकल्याचा, विहान श्रीवास्तवचा (Vihaan Srivastava) जीव गेल्यानंतर मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून आता भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार अमीत साटम (Ameet Satam) यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारभारावर आणि भूमिकेवर तीव्र शब्दांत आक्षेप घेत थेट हल्लाबोल केला आहे. “विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला? आणि याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल साटम यांनी उपस्थित केला आहे.

अमीत साटम यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत पालिका प्रशासनाचा ढिसाळपणा आणि बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आणला आहे. अमीत साटम यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एका नामांकित वृत्तपत्रातील “Who killed Vihaan? BMC insists no one” ही हेडलाईन शेअर केली आहे.

Vihaan Srivastava Death महापौर आणि प्रशासन आमने-सामने

मुंबईतल्या चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेचा अहवाल सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुंबई महापालिका प्रशासन आणि महापौर रितू तावडे आमनेसामने आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या दुर्घटना प्रकरणात चौकशी समितीनं कंत्राटदाराची जबाबदारी मान्य करून त्याला पाच लाख रुपयांचा आणि सल्लागार कंपनीला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पण महापालिका अधिकाऱ्यांसह मुंबई महापालिकेच्या रस्ते आणि उद्यान विभागाला क्लीन चीट देण्यात आली आहे.

चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत विहान श्रीवास्तव नावाच्या अकरा वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या सूचनेनुसार उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीनं महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे आपला अहवाल सादर केला. पण तो अहवाल आपल्याला मान्य नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे.

चेंबूरच्या दुर्घटनेची जबाबदारी कंत्राटदार आणि महापालिका प्रशासनाची असल्याची भूमिका महापौर रितू तावडे यांनी मांडली आहे. तर मुंबई महापालिका जबाबदारी झटकत असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे  विरोधकांनीही महापालिका अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीचा हा अहवाल असल्याचा आरोप केला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

चेंबूरच्या या दुर्दैवी घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या पावसाळापूर्व कामांवर, आपत्कालीन यंत्रणेवर आणि एकूणच ढिसाळ कारभारावर मुंबईकरांमधून पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता अमीत साटम यांच्या या थेट राजकीय हल्ल्यानंतर बीएमसी प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते किंवा दोषींवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा : 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *