छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात 90 च्या दशकात दहशत निर्माण करणाऱ्या आणि महिन्याभरापूर्वी निधन झालेल्या बाबा फर्जन (Baba Farhan) याच्या आलिशान बंगल्यावरील पोलीस छाप्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या छाप्यात तब्बल साडेपाच कोटी रुपयांची रोख रक्कम, सोने-चांदी आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.
आता या संपूर्ण प्रकरणात एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा वळण देणारा ट्विस्ट समोर आला आहे. दिवंगत बाबा फर्जन यांचा मुलगा फिरदोस फर्जन (Firdous Farzan) याने मीडियासमोर येत वडिलांच्या संपूर्ण संपत्तीवर आपला कायदेशीर दावा ठोकला आहे. इतरांसाठी माझे वडील डॉन असतील, पण आमच्यासाठी ते चांगले वडील होते, असे म्हणत त्याने संपत्ती आपल्यालाच मिळाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
Firdous Farzan Statement : वडिलांच्या मेहनतीचा पैसा मलाच मिळाला पाहिजे
वडिलांच्या मृत्यूच्या महिनाभरानंतर आणि पोलीस कारवाईनंतर समोर आलेल्या फिरदोस फर्जन याने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, “माझ्या वडिलांची सर्व संपत्ती मलाच मिळाली पाहिजे. त्यांची शेती, घर आणि घरातून पोलिसांनी जप्त केलेले साडेपाच कोटी रुपये मला मिळाले पाहिजेत. तो माझ्या वडिलांच्या कष्टाचा आणि मेहनतीचा पैसा आहे.”
बाबांच्या घरात सध्या राहणारी महिला ही त्यांची पत्नी नसून, ती केवळ एक ‘केअरटेकर’ म्हणून तिथे राहत होती, असा दावा फिरदोस फर्जन याने केला आहे.
Baba Farzan Property : 20 वर्षांपूर्वीच सोडले घर
फिरदोस फर्जन म्हणाला की, “मी जेव्हा २० वर्षांचा होतो, तेव्हाच काही कौटुंबिक कारणांमुळे बाबांना सोडून आम्ही इतर ठिकाणी स्वतंत्र राहायला गेलो होतो. म्हणूनच घरात असलेल्या बंदुका, शस्त्रसाठा आणि इतर साहित्याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. बाबांच्या निधनाची अधिकृत बातमी देखील आम्हाला घरातून मिळाली नाही, तर इतर लोकांकडून आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली.”
Police Raid Update : पोलीस तपासाची सूत्रे आता ‘आयकर विभागाकडे’
महिनाभरापूर्वी बाबा फर्जनचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पडेगाव येथील आलिशान बंगल्यात कोट्यवधींची रोकड आणि बेकायदेशीर शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने (Crime Branch) टाकलेल्या पहाटेच्या छाप्यात:
५.५ कोटींची रोकड (मोजण्यासाठी मशीन मागवावे लागले होते).
सोने-चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे.
परवानाधारक बंदुका, एक विनापरवाना बंदूक, 3 एअर गन, तलवारी, चाकू आणि सुमारे 400 ते 500 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती.
दुसऱ्या टप्प्यातील झाडाझडती
या मोठ्या जप्तीनंतर पोलिसांच्या पथकाने गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्यासाठी बाबा फर्जनच्या जुन्या बंगल्यासह (बुढीलेन परिसर) त्याच्या कारखान्याचीही कसून तपासणी केली. मात्र, या दुसऱ्या झाडाझडतीत पोलिसांच्या हाती विशेष काही लागले नाही. जुन्या घरातून केवळ काही जुने फोटो आणि काही सूटकेस मिळाल्या आहेत.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या रोख रकमेचा आणि आर्थिक व्यवहारांचा स्त्रोत शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आता थेट आयकर विभागाला (Income Tax Department) पत्र पाठवले आहे. आयकर विभाग आता या बेनामी मालमत्तेची आणि पैशांची स्वतंत्र चौकशी करणार आहे.
Who was Baba Farhan : कोण होता बाबा फर्जन?
बाबा फर्जन हा 1980 आणि 1990 च्या दशकात छत्रपती संभाजीनगर (तेव्हाचे औरंगाबाद) शहरातील एक अत्यंत कुख्यात गुंड, डॉन आणि कामगार नेता म्हणून ओळखला जात होता. जुन्या शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘बुढीलेन’ भागातून तो आपली गुन्हेगारी टोळी आणि कारभार चालवायचा. गुन्हेगारीच्या जोरावर आपले बस्तान बसवल्यानंतर, त्याने राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि 1990 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून नशीबही आजमावले होते. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती आणि वारसदार यांच्यातील वाद चांगलाच चिघळण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा:
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया