Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमा… हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गुरु, शिक्षक, माता-पिता आणि जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रातही गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. हा दिवस ज्ञान, अध्यात्म, गुरु कृपा आणि शुभ ग्रहांच्या आशीर्वादाशी संबंधित मानला जातो. ज्योतिषींच्या मते, या दिवशी अनेक शुभ योग बनतायत, ज्याचा फायदा अनेक राशींच्या लोकांना होणार आहे. भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या…
गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व….(Guru Purnima 2026)
पौर्णिमा दर महिन्याला येत असली तरी, गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते. ही पौर्णिमा गुरूंना समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हिंदू महाकाव्य महाभारताचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच पौर्णिमेला झाला होता, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार या वर्षीची गुरुपौर्णिमा खूप विशेष मानली जात आहे. कारण या दिवशी प्रीती योग आणि हर्षण योग आहेत. 2026 मधील गुरुपौर्णिमेची तिथी आणि महत्त्व जाणून घेऊया.
गुरुपौर्णिमा तिथी..
या वर्षी, गुरुपौर्णिमेचा सण 29 जुलै, 2026 रोजी साजरा केला जाईल. पौर्णिमेची सुरुवात 28 जुलै रोजी सायंकाळी 6:18 वाजता होईल आणि 29 जुलै रोजी रात्री 8:05 वाजता संपेल.
गुरूपौर्णिमेला शुक्राचं संक्रमण, 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत..
ज्योतिषशास्त्रानुसार, 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेला शुक्र ग्रह देखील आपले नक्षत्र बदलणार आहे. शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, कला, सुखसोयी आणि ऐश्वर्य यांचा कारक मानले जाते. जेव्हा जेव्हा शुक्र आपले भ्रमण किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींना जाणवतो. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र बदलांचे प्रत्येक राशीवर वेगवेगळे परिणाम होतात. 29 जुलै रोजी शुक्र आपले नक्षत्र भ्रमण करणार आहे, ज्यामुळे प्रेम, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये तीन राशींसाठी सकारात्मक बदल घडू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, हे संक्रमण तीन राशींसाठी राजयोगासारखे सुख घेऊन येईल.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी असलेला शुक्र ग्रह स्वतः या राशीसाठी अनुकूल मानला जातो. व्यावसायिकांना फायदेशीर सौदा मिळण्याची शक्यता आहे, तर नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळू शकते. आर्थिक बाबींमध्ये सुधारणेची चिन्हे आहेत आणि दीर्घकाळच्या समस्या कमी होऊ शकतात. कौटुंबिक पाठिंब्यामुळे मानसिक समाधानही मिळेल.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ या राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि करिअर या दोन्ही बाबतीत अनुकूल मानला जातो. अविवाहित व्यक्ती नवीन नातेसंबंध सुरू करू शकतात, तर जे आधीच नात्यात आहेत त्यांचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. त्यांना त्यांच्या मुलांसंबंधी चांगली बातमी देखील मिळू शकते. जे नोकरी करतात, त्यांच्यासाठी पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमधील आवड देखील वाढू शकते.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार हे संक्रमण तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक अधिक दृढ होईल. एकूणच, 11 ऑगस्टपर्यंतचा काळ मकर राशीच्या लोकांसाठी आनंद, समृद्धी आणि प्रगती दर्शवू शकतो.
गुरुपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
या श्लोकाचा अर्थ आहे, “गुरु ब्रह्मा आहेत, गुरु विष्णू आहेत, गुरु शंकर आहेत, गुरु परम ब्रह्मा आहेत; मी त्या सद्गुरूंना वंदन करतो.” हा श्लोक आपल्याला स्पष्टपणे सांगतो की आपल्या जीवनात गुरु किती महत्त्वाचे आहेत. हिंदू धर्मात गुरूंना देवाचा दर्जा दिला जातो. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या आदराने साजरी केली जाते. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंप्रति आदर व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, महाभारताचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता आणि त्यांना पहिले गुरू मानले जाते.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)