Bollywood Song Story: माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या ‘या’ गाण्याची क्रेझ कायम


Bollywood Song Story: हिंदी सिनेसृष्टीच्या (Hindi Film Industry) सुवर्णकाळात अशी अनेक गाणी रचली गेली, जी कालांतरानं लोकांच्या हृदयात टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे ‘काला बाजार’ (Kaalaa Baazaar) सिनेमातलं ‘खोया-खोया चांद, खुला आसमान’ (Khoya Khoya Chand Khula Aasman) हे सदाबहार गाणं. मोहम्मद रफींचा (Mohammed Rafi) आवाज, देव आनंद (Dev Anand) यांचा क्लासी अंदाज आणि वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांचं लाघवी सौंदर्य यामुळे हे गाणं कायमचं सर्वांच्याच लक्षात राहिलं. पण हे प्रसिद्ध गाणं बनवण्याची कहाणी सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही, हे फार कमी लोकांना माहिती आहे. तेव्हा गाणी लिहिण्यासाठी कागद किंवा पेन उपलब्ध नव्हते. मग या धुरंधर संगीतकारांनी हे गाणं कसं रचलं माहितीय? हातात माचिसचा बॉक्स, समुद्राच्या किनाऱ्यावर घालवलेली एक रात्र आणि तीन दिग्गज कलाकारांच्या मेहनतीच्या जोरावर सहा दशकानंतरही संगीतप्रेमींची पहिली पसंती असलेलं हे अजरामर गाणं तयार झालंय. 

जेव्हा एस.डी. बर्मन यांनी मुलगा आरडी बर्मन यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी (Indian Music Director R. D. Burman)

1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काला बाजार’ सिनेमासाठी संगीतकार एस.डी. बर्मन यांनी या गाण्याचे सूर यापूर्वीच संगीतबद्ध केले होते. सिनेमाचे निर्माते देव आनंद यांना सिनेमासाठी प्रसिद्ध गीतकार शैलेंद्र यांनी गाणं लिहावं असं वाटत होतं. मात्र, शैलेंद्र त्यावेळी इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यानं गाणं पूर्ण होऊ शकलं नाही. अशा परिस्थितीत एसडी बर्मन यांनी त्यांचा मुलगा आरडी बर्मन याला शैलेंद्रला भेटायला सांगितलं आणि गाणं लिहून झाल्यावरच परत यायला सांगितलं. वडिलांनी फर्मान सोडताच पंचम दा थेट शैलेंद्रकडे गेले, पण त्या रात्रीही गाणं तयार होऊ शकलं नाही.

जुहू बीचवर एका माचिस बॉक्समुळे रचलं गेलं अजरामर गाणं

काही वेळ चर्चा केल्यानंतर शैलेंद्र आणि आर. डी. बर्मन जुहू बीचवर पोहोचले. रात्र गडद होत चालली होती, तरीही गाण्याची पहिली ओळ काही सुचत नव्हती. विचारमग्न असताना शैलेंद्र सतत धूम्रपान करत होते. आगपेटी संपल्यावर त्यांनी पंचम दांकडे आगपेटी मागितली आणि त्यांना ती चाल पुन्हा गुणगुणण्याची विनंती केली. आर. डी. बर्मन ती चाल गुणगुणत असतानाच शैलेंद्र यांची नजर आकाशातील चमकणाऱ्या चंद्रावर पडली आणि अचानक त्यांना गाण्याची कल्पना सुचली. त्याच क्षणी, त्या चालीचे स्वर आणि गाण्याची सुरुवात त्या आगपेटीवरच टिपून घेण्यात आली. ती साधीशी आगपेटी त्या ऐतिहासिक गाण्याची पहिली ‘प्रत’ ठरली.

मोहम्मद रफी यांनी आवाजाच्या जादूनं गाणं अजरामर केलं…

दुसऱ्या दिवशी शैलेंद्र यांनी गाण्याचे बोल फायनल केले आणि ते एस. डी. बर्मन यांच्याकडे सोपवले. त्यानंतर, मोहम्मद रफी यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजातून या गाण्यात प्राण ओतला. जेव्हा देव आनंद आणि वहीदा रहमान यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला मनापासून पसंती दिली. आज या गाण्याला अनेक दशके उलटूनही, रेडिओ, दूरदर्शन, संगीत प्लेलिस्ट आणि स्टेज शो अशा सर्वच माध्यमांत ‘खोया-खोया चांद’ हे गाणं आजही अत्यंत लोकप्रिय आणि प्रिय आहे. हे गाणं केवळ एक ‘सुपरहिट’ ठरलं नाही, तर त्या काळातील सर्जनशीलता, संयम आणि संगीताप्रती असलेल्या निष्ठेचा एक चिरंतन पुरावा ठरलंय, एक असा वारसा जो हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actors Struggle Life: कधीकाळी शिवणकाम करायचा ‘हा’ अभिनेता; रिटायरमेंटच्या वयात संधी मिळाली, पन्नाशीत दिले 250 हून अधिक सुपरहिट सिनेमे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *