Jannik Sinner Win Wimbledon 2026 : पहिले जोकोविचला धूळ चारली, नंतर फायनलमध्ये पहिला सेट हरूनही अलेक्झांडरला नमवलं; यानिक सिन्नर ‘विम्बल्डन’चा नवा राजा!


Jannik Sinner defeats Alexander Zverev to win Wimbledon title : इटलीचा टेनिस सुपरस्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिन्नर याने टेनिस जगतात आपला दबदबा कायम ठेवला आहे. फिटनेसच्या समस्येमुळे फ्रेंच ओपन 2026 मुकावे लागल्यानंतर सिन्नरने विम्बल्डन 2026 मध्ये धडाकेबाज पुनरागमन केले. रविवारी 12 जुलै रोजी झालेल्या ऐतिहासिक सेंटर कोर्टवरील अंतिम सामन्यात सिन्नरने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. 4 सेटपर्यंत चाललेल्या या अत्यंत चुरशीच्या आणि रोमहर्षक सामन्यात सिन्नरने जर्मनीच्या दुसऱ्या सीडेड अलेक्झांडर झ्वेरेव्हला 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. हे त्याचे दुसरे विम्बल्डन आणि एकूण 5 वे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.

आधी नोव्हाक जोकोविचला धूळ चारली

विम्बल्डनच्या या हाय-व्होल्टेज अंतिम सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी सेंटर कोर्टवर हजारो प्रेक्षकांसह अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. गेल्या वर्षीचा चॅम्पियन असल्याने सर्वांच्या नजरा 24 वर्षीय यानिक सिन्नरवर खिळल्या होत्या. उपांत्य फेरीत त्याने महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा अवघ्या 3 सेटमध्ये धुव्वा उडवला होता, त्यामुळे सिन्नरचे पारडे आधीच जड मानले जात होते. मात्र, नुकताच फ्रेंच ओपनचा किताब जिंकून फॉर्मात आलेल्या अलेक्झांडरविरुद्ध विजय मिळवणे सिन्नरसाठी सोपे नव्हते.

3 तास 46 मिनिटे चाललेल्या लढतीत मारली बाजी

सामन्याच्या सुरुवातीला अलेक्झांडरने आक्रमक खेळ केला. पहिला सेट टाय-ब्रेकरपर्यंत गेला, जिथे अलेक्झांडरने बाजी मारत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. अलेक्झांडरला जेतेपदासाठी आता केवळ 2 सेट हवे होते, तर सिन्नरला सलग 3 सेट जिंकण्याचे कठीण आव्हान होते. दुसऱ्या सेटमध्येही दोघांमध्ये अटीतटीच्या सामना पाहायला मिळाला आणि हा सेटही टाय-ब्रेकरमध्ये पोहोचला. मात्र, यावेळी वर्ल्ड नंबर-1 सिन्नरने आपला संयम राखत सेट खिशात टाकला आणि सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.

यानंतरच्या पुढील दोन्ही सेटमध्ये सिन्नरने आपल्या अनुभवाचा वापर करत जर्मन स्टार अलेक्झांडरला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही आणि 3 तास 46 मिनिटे चाललेल्या लढतीत मारली बाजी. सिन्नरने 6-3, 6-4 अशा फरकाने पुढील दोन्ही सेट जिंकत सिनरने पुन्हा एकदा विम्बल्डन ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

सिन्नरचे पहिले ग्रँड स्लॅम 

यानिक सिन्नरसाठी हे जेतेपद अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या हंगामातील त्याचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम ठरले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता, तर फ्रेंच ओपनमध्ये दुखापतीमुळे तो दुसऱ्याच फेरीत बाहेर पडला होता.

हे ही वाचा –

Dhanashree Verma: ‘लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात…’, घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *