राज्यात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील नरसापूरमध्ये एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मुंबईतील पायधुनीत एका सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका 32 वर्षीय वॉचमनने मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पायधुनीत हा संतप्त प्रकार घडला आहे. 32 वर्षांच्या नराधमाने 7 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद प्रकार केला आहे. मुलगी रविवार असल्याने दुपारी घराबाहेर पडली होती. परंतु या मुलीवर वासनांध वॉचमनची नजर पडली. या वॉचमनने तिच्यावर गोदामाच्या पोटमाळ्यावर नेऊन अत्याचार केला.
मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना चिमुकली गोदामाच्या पोटमाळ्यावर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. या अल्पवयीन मुलीवर वॉचमनने अत्याचार केल्याचे उघड झाले. त्यानंतर स्थानिकांनी नराधमाला चोप दिला. त्यानंतर पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिसांनी त्या नराधमाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर मुलीला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला दाखल केले. मुलीची परिस्थिती नाजू असल्याने तिला तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल केले. आता त्या मुलीची प्रकृती स्थिर असून त्या नराधमावरत अजून काही गुन्हे आहेत का, याचा तपास पायधुनी पोलीस करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून महिला आणि बालकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नराधमाला आज कोर्टात करणार हजर
तत्पूर्वी, 7 वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या 32 वर्षीय नराधमाला पायधुनी पोलीस स्टेशनवरून रात्री 12.55 वाजता पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात पायधूनी पोलीस घेऊन नेले. वैद्यकीय तपासणी साधारण 3 तास लागले, मेडिकलनंतर त्या नराधमाला पुन्हा पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम वॉचमनला आज सोमवारी मुंबई सत्र न्यायालय विशेष पॉक्सो कोर्टात रिमांडसाठी हजर करणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टात सुनावणी होईल. नराधम वॉचमनवर पॉक्सो आणि BNS कलम 69 अंतर्गत पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या विरुद्ध आणखी काही गुन्हे आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.