नेरुळच्या रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना,  कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल


Navi Mumbai Crime News : नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना भरदिवसा घडली आहे. स्टेशनच्या वर्दळीच्या ठिकाणी एका माथेफिरूने थेट कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. 

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

वाईन शॉपबाहेर भररस्त्यात, जाहीरपणे मद्यप्राशन केले जाते. येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना त्रास दिला जातो. महिला, विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे पोलीस किंवा स्थानिक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने या गुंडांचे धाडस आता पोलिसांवरच हात उचलण्याइतके वाढले आहे. पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सद्या व्हायरल झाला आहे.

भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर हल्ला

भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला रोहित पवार यांनी घडवून आणला असल्याचा आरोप वैभव सोलनकर यांनी केला आहे. इंदापूर शेटफळेगडे येथील शेतकऱ्यांची बैठक संपवून सोलनकर घरी परतत असताना,पालखी महामार्गालगतच्या कान्हेरी रोडवर हा हल्ला झाला.​विना नंबरप्लेटच्या दोन दुचाकींवरून आलेल्या अज्ञात इसमांनी सोलनकर यांच्या गाडीवर दगडफेक केली असा आरोप त्यांचा आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा इथं तरुणावर हल्ला

भिवंडी तालुक्यातील पडघा येथील राहुल बारमध्ये दारु पित असताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “तू माझ्याकडे रागाने का बघतो?” या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांमध्ये आधी शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळातच हा वाद विकोपाला जाऊन दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याच संतापातून अल्ताफ सय्यद (वय 26) याने अतुल जाधव याच्यावर सुऱ्याने सपासप वार केले. या हल्ल्यात अतुल जाधव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला

येवला तालुक्यातील आणि मनमाड नजीक असलेले अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवाजी गरुड या शेतकऱ्याच्या बंगल्यातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्रा निसटल्यानंतर त्याने धूम ठोकल्यामुळे त्याचा जीव वाचला. शिकार न करताच बिबट्याला परत जावे लागले. हल्ल्याचा हा सर्व थरार सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अंकाई किल्ल्यावर पर्यटकांची नेहमी गर्दी असते. शिवाय मनमाड -नगरसूल मार्गांवर रात्रंदिवस वाहतूक सुरु असते. याच भागात बिबट्या फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.. वन विभागाने बिबट्याला जे्रबंद करण्याची मागणी केली जात आहे.

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *