Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते ‘हिरो’ कसे बनले? रंजक किस्सा


मुंबई : आपल्या अनोख्या स्टाईलने आणि ‘भिडू’ या शब्दाने संपूर्ण बॉलिवूडसह प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. वय वाढलं तरी त्यांचा उत्साह आणि तरुणांना प्रेरित करण्याची त्यांची शैली आजही कायम आहे. जॅकी दादा कोणत्याही कार्यक्रमात जाताना नेहमी आपल्यासोबत एक छोटे झाड घेऊन फिरतात.

नुकत्याच झालेल्या एबीपी माझाच्या ‘माझा सन्मान पुरस्कार 2026’ या कार्यक्रमात (ABP Majha Sanman Awards 2026) त्यांनी यामागचे अत्यंत सुंदर कारण स्पष्ट केलं. यासोबतच त्यांना तरुणपणी भारतीय नौदलात (Indian Navy) अधिकारी व्हायचं होतं, मात्र नशिबाने आणि वडिलांनी कुंडली पाहून दिलेल्या सल्ल्याने ते चित्रपटसृष्टीत ‘हिरो’ कसे बनले, याचा एक रंजक किस्सा शेअर केला.

एबीपी माझाच्या ‘माझा सन्मान पुरस्कार 2026’ या कार्यक्रमात (ABP Majha Sanman Awards 2026) महाराष्ट्रातील गुणीजन म्हणून ओळखले जाणारे सुनिल गावसकर, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, पंडित विजय घाटे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलाखत घेतली आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से समोर आणले.

Jackie Shroff Tree Message : जॅकी श्रॉफ सोबत झाड का घेऊन फिरतात? 

जॅकी श्रॉफ त्यांच्यासोबत नेहमी झाड का घेऊन फिरतात असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, “एक दिवस सगळ्यांना मातीमध्ये जायचं आहे, त्यामुळे मातीशी दोस्ती केली पाहिजे. मुलांना पर्यावरण काय आहे ते शिकवायचं आहे. एका हातात मोबाईल टेक्नॉलॉजी तर दुसऱ्या हातात झाड हवं. त्यामुळे पर्यावरण वाचवण्याचा संदेश पुढच्या पीढीपर्यंत पोहोचेल. हे झाड मला वाचवतं, ऑक्सिजन देतं. त्यामुळे मी सोबत नेहमी झाड घेऊन फिरतो.”

Jackie Shroff Astrology: नेव्हीचा ऑफिसर व्हायचं होतं, पण…

आपल्या अभिनयामुळे बॉलवूडमध्ये नाव कमावणाऱ्या जॅकी श्रॉफ यांना सुरुवातीला अभिनेता व्हायचं नव्हतं, तर त्यांना नेव्हीमध्ये अधिकारी व्हायचं होतं. ही माहिती जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये दिली. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटात पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारली. त्यावर त्यांना जीवनात पोलीस अधिकारी व्हायचं होतं का असा प्रश्न विचारण्यात आला. 

त्यावर बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले की, मला नेव्हीचा अधिकारी व्हायचं होतं, पण केमेस्ट्री आणि गणितात कमी मार्क्स मिळाले, दोन्ही विषयात नापास झालो. त्यामुळे त्यामध्ये यश आलं नाही. त्यावेळी मी वैतागलो होतो. माझे बाबा हे ज्योतिषशास्त्र जाणत होते. त्यांनी माझी कुंडली पाहिली आणि मला सांगितलं की, टेन्शन नको घेऊ, तू अॅक्टर बनशील. पुढे जाऊन वडिलांचे शब्द खरे ठरले. अचानक मॉडेलिंगची संधी मिळाली आणि चित्रपटात हिरो बनलो. 

Jackie Shroff Fan Moment : फॅन मोमेंट कोणती? 

आपल्या आयुष्यातील फॅन मोमेंट कोणती असा प्रश्न जॅकी श्रॉफ यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, “एका ठिकाणी माझ्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं आणि त्याच्या वरच्या स्टेजवर अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी बच्चन साहेबांची मुलं म्हणजे अभिषेक आणि त्याची बहीण हे माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझा ऑटोग्राफ मागितला. त्यावेळी तो माझ्यासाठी मोठा फॅन मोमेंट होता.”

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *