Pandharpur Wari: विठुरायाचं दर्शन अन् पंढरीचा प्रसाद, 10 रुपयांच्या चुरमुऱ्यातून कोटींची उलाढाल, परंपरा काय? Video | सोलापूर बातम्या


Last Updated:

Ashadhi Wari: पंढरीची वारी करून घरी परतताना वारकरी आवर्जून चुरमुरे आणि फुटाण्यांचा प्रसाद सोबत नेतात. याच चुरमुऱ्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होते.

+

विठुरायाचं

विठुरायाचं दर्शन अन् पंढरीचा प्रसाद, 10 रुपयांच्या चुरमुऱ्यातून कोटींची उलाढाल, परंपरा काय? Video

पंढरपूर – विठू माऊलीच्या ओढीने पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन जितके महत्त्वाचे असते, तितकाच परतीच्या प्रवासात घरच्यांसाठी विठ्ठलाचा प्रसाद घेऊन जाणे हा श्रद्धेचा भाग असतो. पंढरीची वारी करून घरी परतताना वारकरी आवर्जून चुरमुरे आणि फुटाण्यांचा प्रसाद सोबत नेतात. याच चुरमुऱ्यांच्या माध्यमातून यंदाच्या आषाढी वारीत तब्बल 1 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात स्थानिक व्यावसायिक रमेश लोखंडे यांनी ‘लोकल 18’ शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

​महिन्याभरापासून व्यापाऱ्यांची जय्यत तयारी

​पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ अशा चार प्रमुख वाऱ्या भरतात. या सर्व वाऱ्यांमध्ये ‘आषाढी वारी’ ही सर्वात मोठी वारी मानली जाते. महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक आणि इतर राज्यांतूनही लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. या अथांग जनसागराला प्रसादाची कमतरता भासू नये, म्हणून पंढरपुरातील चुरमुरे विक्रेते आणि व्यापारी महिनाभरापासूनच जय्यत तयारी करत असतात. वारीच्या काळात मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची वर्षभराची उलाढाल या एकाच वारीतून होत असते, त्यामुळे व्यापारी वर्गात सध्या कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

फक्त 10 रुपयांच्या प्रसादातून कोटींची उलाढाल

​वारीच्या काळात अगदी गरिबातील गरीब वारकऱ्यालाही परवडेल अशा म्हणजेच अवघ्या 10 रुपयांपासून चुरमुऱ्यांच्या प्रसादाची पाकिटे उपलब्ध असतात. लहान वाटणारा हा व्यवसाय आषाढी वारीच्या कालावधीत तब्बल 1 कोटी रुपयांचा टप्पा पार करतो, अशी माहिती व्यापारी रमेश लोखंडे यांनी दिली आहे.

​इतर व्यवसायांनाही सुगीचे दिवस; 30 ते 40 कोटींचे मार्केट

​आषाढी वारी केवळ चुरमुरे विक्रेत्यांसाठीच नाही, तर पंढरपुरातील इतर स्थानिक आणि बाहेरील व्यापाऱ्यांसाठीही मोठी आर्थिक पर्वणी ठरते. वारीच्या काळात हॉटेल व्यवसाय, लहान मुलांची खेळणी आणि संसारोपयोगी साहित्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तारते. वारकऱ्यांसाठी आवश्यक असणारे टाळ, मृदुंग आणि वीणा यांसारख्या आध्यात्मिक साहित्याला प्रचंड मागणी असते.

​चुरमुऱ्यांव्यतिरिक्त या इतर सर्व व्यवसायांतून वारीच्या काळात तब्बल 30 ते 40 कोटी रुपयांची उलाढाल होते. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरच्या राज्यांतून आलेल्या व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने सजवली असून, पंढरीची बाजारपेठ विठ्ठल नामाच्या गजरासोबतच आर्थिक उलाढालीसाठीही सज्ज झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *