Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा ‘तो’ एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी


Pune Moshi Building Collapse: मोशी येथील कचरा डेपोतील (Garbage Depot) कचऱ्याचा महाकाय डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याची अत्यंत धक्कादायक दुर्घटना बुधवारी, 8 जुलै रोजी दुपारी घडली. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेत तब्बल  9 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दिघी येथील रहिवासी असलेले 36 वर्षीय सनी अशोक माने यांचाही समावेश आहे. सनी यांच्या मृत्यूने एका सुखी आणि हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधारच कायमचा हिरावला गेला असून, त्यांच्या पत्नीने केलेला आक्रोश ऐकून संपूर्ण पिंपरी परिसर हळहळत आहे.

मूळचे दिघी येथील असलेले सनी माने हे मोशी कचरा डेपो परिसरात वाहनचालक म्हणून काम करत होते. अत्यंत कष्टाळू स्वभावाच्या सनी यांच्यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी होती. दुर्घटनेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सनी यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. सनी यांच्या पत्नी कांचन यांनी त्यांच्या आवडीची बिर्याणी बनवली होती. सनी यांचे काम आटोपले होते आणि ते घरातल्यांसोबत जेवण करण्यासाठी घरी निघणारच होते.

परंतु, त्याच वेळी तिथे त्यांच्या एका मित्राने ‘आज थांब, आपण सोबतच जेवूया’ असा हट्ट धरला. मित्राचे मन राखण्यासाठी आणि जिव्हाळ्यापोटी सनी तिथेच कॅन्टीनमध्ये थांबले. मात्र, हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील शेवटचा निर्णय ठरेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. ते जेवायला बसणार इतक्यात कचऱ्याचा तो महाकाय ढिगारा इमारतीवर कोसळला आणि सनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

Pune Moshi Building Collapse: पत्नीचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

“घरून फोन आला होता, मी त्यांची आवडीची बिर्याणी बनवली होती. ते घरी जेवायला निघणारच होते, पण मित्राने हट्ट केला म्हणून थांबले. जर ते मित्राचं ऐकून थांबले नसते आणि थेट घराकडे निघाले असते, तर आज आमचा सुखाचा संसार असा उघड्यावर पडला नसता…” असे म्हणत सनी यांच्या पत्नी कांचन यांनी घटनास्थळी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले.

Pune Moshi Building Collapse: चिमुकल्यांचे छत्र हरपले

नियतीने खेळलेल्या या क्रूर खेळामुळे माने कुटुंबाचा हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला आहे. सनी माने यांच्या पश्चात पत्नी कांचन, दोन लहान निष्पाप मुले आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. या भीषण दुर्घटनेने दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र हिरावून घेतले आहे, तर ज्या वृद्ध आई-वडिलांनी आपल्या डोळ्यांदेखत मुलाला मोठे केले, त्यांच्या म्हातारपणाची काठीच नियतीने हिरावून घेतली आहे. एका क्षणाच्या निर्णयाने एका सुखी कुटुंबाचे आयुष्य कसे कायमचे बदलून जाते, याचे हे मन हेलावून टाकणारे उदाहरण पाहून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात शोक व्यक्त केला जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *