Property Rights : मुलांना जन्माने मिळत नाही आई-वडिलांच्या संपत्तीवर अधिकार, 4 कारणांमुळे होऊ शकतात बेदखल! | बिझनेस


Last Updated:

आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा जन्मजात अधिकार असतो, असा अनेकांचा समज आहे, पण कायद्यानुसार हे वाक्य तितकं खरं नाही. कायदा फक्त अधिकार नाही तर जबाबदारीही सांगतो

मुलांना जन्माने मिळत नाही आई-वडिलांच्या संपत्तीवर अधिकार, 4 कारणांमुळे होऊ शकतात बेदखल!
मुलांना जन्माने मिळत नाही आई-वडिलांच्या संपत्तीवर अधिकार, 4 कारणांमुळे होऊ शकतात बेदखल!

मुंबई : आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा जन्मजात अधिकार असतो, असा अनेकांचा समज आहे, पण कायद्यानुसार हे वाक्य तितकं खरं नाही. कायदा फक्त अधिकार नाही तर जबाबदारीही सांगतो, असं अनेक कायदेतज्ज्ञ सांगतात. आई-वडिलांची काळजी घेतली नाही तर मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार पालकांना असतो, पण याशिवायही अनेक कारणांमध्ये आई-वडील मुलांना संपत्तीमधून बेदखल करू शकतात. ऍडव्होकेट राकेश उपाध्याय यांनी कोणकोणत्या कारणांमुळे आई-वडील मुलांना त्यांच्या संपत्तीतून बाहेर ठेवू शकतात, याबाबत माहिती दिली आहे.

आई-वडिलांनी स्वत: बनवलेली प्रॉपर्टी

संपत्ती ही दोन प्रकारची असते. यातला पहिला प्रकार म्हणजे वडिलोपार्जित आणि दुसरा प्रकार म्हणजे स्वत: कमावलेली. आई-वडिलांनी स्वत:च्या मेहनतीने कमावलेल्या पैशांमधून संपत्ती विकत घेतली असेल तर अशा संपत्तीवर 100 टक्के अधिकार त्यांचा असतो, त्यामुळे ते अशी संपत्ती अनोळखी व्यक्ती किंवा ट्रस्टला दान करू शकतात. तसंच मृत्यूपत्र तयार करून मुलाला बेदखलही करू शकतात. या परिस्थितीमध्ये मुलं कोर्टात गेली तरी त्यांना संपत्तीमध्ये हिस्सा मिळत नाही.

आई-वडिलांसोबत गैरवर्तन

जर मुलांनी आई-वडिलांना मारहाण केली, मानसिक त्रास दिला किंवा गैरवर्तन केलं तर मेनटेनन्स ऍण्ड वेलफेअर ऑफ पॅरेन्ट्स ऍण्ड सीनियर सिटीझन ऍक्टच्या अंतर्गत आई-वडील मुलांना संपत्तीतून बाहेर काढू शकतात. यासाठी त्यांना ट्रिब्यूनलमध्ये जावं लागतं. या परिस्थितीमध्ये आधीच दिलेली प्रॉपर्टी किंवा गिफ्ट डीडही रद्द केलं जाऊ शकतं.

हत्येचा प्रयत्न

या सगळ्यामध्ये हिंदू सक्सेशन ऍक्टही तितकाच महत्त्वाचा आहे. जर मुलाने संपत्तीच्या मोहातून किंवा दुसऱ्या कारणामुळे आई-वडिलांची हत्या केली किंवा हत्येचा प्रयत्न केला तरीही कायदा मुलाला आई-वडिलांच्या संपत्तीतून बेदखल करतो. अशा मुलाला आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये कोणताही हक्क राहत नाही.

मृत्यूपत्रामध्ये नाव नसणं

जर आई-वडिलांनी कायदेशीररित्या मृत्यूपत्र तयार केलं आणि त्यात एखाद्या मुलाचं नाव टाकलं नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्रामध्ये लिहिलेल्या इच्छेनुसार संपत्तीची वाटणी होईल. याविरोधात मुलगा कोर्टात गेला तर त्याला आई-वडिलांनी केलेलं मृत्यूपत्र बनावट असल्याचं सिद्ध करावं लागेल, पण हे मृत्यूपत्र खरं आणि कायदेशीर असेल तर मात्र मुलाला संपत्तीमध्ये एकही रुपया मिळणार नाही.

मराठी बातम्या/मनी/

Property Rights : मुलांना जन्माने मिळत नाही आई-वडिलांच्या संपत्तीवर अधिकार, 4 कारणांमुळे होऊ शकतात बेदखल!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *