Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी


मुंबई : बदलत्या काळात लोक पैशांसाठी नाती आणि मैत्री विसरत असल्याच्या अनेक घटना आपण पाहतो. मात्र, याला अपवाद ठरणारी आणि माणसाचा प्रामाणिकपणावरचा विश्वास दृढ करणारी एक अत्यंत भावनिक आणि कौतुकास्पद घटना समोर आली आहे. केरळमधील एका व्यक्तीने आपल्या मित्राकडून 35 वर्षांपूर्वी घेतलेले 25 हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला आणि मित्राचे घर शोधून त्याचे पैसे सुरक्षित परत केले आहेत.

केरळच्या पलक्कड (Palakkad) येथे राहणारे मोहम्मद इस्माईल (Muhammad Ismail) असे या प्रामाणिक मित्राचे नाव आहे. ते तब्बल 35 वर्षांपूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी केरळमधून शेकडो किलोमीटर दूर तेलंगणात पोहोचले आणि त्यांनी आपल्या मित्राचा शोध घेऊन त्याचे पैसे त्याच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले.

Saudi Arabia Friends Story : 90 च्या दशकातील मैत्री, संकटकाळात मदतीला धावला मित्र

ही गोष्ट साधारण 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धातील आहे. तेलंगणाच्या जगित्याल जिल्ह्यातील धर्मपुरी गावचे रहिवासी असलेले एडला लचन्ना (Edla Lachanna) आणि केरळचे मोहम्मद इस्माईल हे दोघेही सौदी अरबमध्ये (Saudi Arabia) एकाच कंपनीत मजूर म्हणून काम करत होते. परदेशात एकत्र काम करत असताना दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री झाली.

त्याच काळात मोहम्मद इस्माईल यांच्यावर अचानक आर्थिक संकट कोसळले. अशा कठीण परिस्थितीत मित्र लचन्ना याने इस्माईल यांना 25 हजार रुपये रुपये उधार दिले. त्यानंतर काही दिवसांतच इस्माईल भारतात परतले. भारत देशात परतताना त्यांनी लचन्ना यांना शब्द दिला होता की, परिस्थिती सुधारली की मी तुझे पैसे नक्की परत करेन.

Google Map Search Friend : गुगल आणि गावकऱ्यांच्या मदतीने शोधले घर

भारतात परतल्यानंतर मोहम्मद इस्माईल यांच्या आर्थिक अडचणी संपत नव्हत्या, त्यामुळे ते अनेक वर्षे हे कर्ज फेडू शकले नाहीत. दरम्यानच्या काळात दोघांमधील संपर्क पूर्णपणे तुटला. इस्माईल यांच्याकडे लचन्ना यांचा फोन नंबर किंवा घराचा पत्ता काहीच नव्हते. त्यांना फक्त एवढेच आठवत होते की, त्यांचा मित्र तेलंगणातील ‘धर्मपुरी’ नावाच्या गावातील आहे.

आर्थिक परिस्थिती सुधारताच इस्माईल यांनी मित्राचे पैसे परत करण्याचा निश्चय केला. त्यांनी गुगलवर (Google) धर्मपुरी शहराचा शोध घेतला आणि थेट तेलंगणा गाठले. धर्मपुरी गावात पोहोचल्यावर त्यांनी स्थानिक लोकांकडे लचन्ना यांच्याबद्दल चौकशी सुरू केली. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने गुरुवारी दुपारी ते लचन्ना यांच्या घरी पोहोचले.

Heart Touching Viral Story : मित्र कर्ज विसरला, पण याने प्रामाणिकपणे फेडले 25 हजार

केरळमधून एक अनोळखी व्यक्ती थेट घरी आल्याचे पाहून लचन्ना यांचे कुटुंबीय पूर्णपणे थक्क झाले. त्यांनी तातडीने सौदी अरबमध्ये सध्या काम करत असलेल्या लचन्ना यांना फोन लावून ही माहिती दिली. लचन्ना हे कित्येक दशकांपूर्वी आपल्या मित्राला दिलेले ते 25 हजार रुपयांचे कर्ज केव्हाच विसरून गेले होते.

मात्र, या अचानक आलेल्या फोन कॉलमुळे दोघांच्या सौदीमधील मैत्रीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दोन्ही जुन्या मित्रांनी फोनवर एकमेकांशी संवाद साधला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर मोहम्मद इस्माईल यांनी लचन्ना यांच्या कुटुंबीयांकडे 25,000 रुपये सुपूर्द केले आणि कित्येक वर्षांपासून मनावर असलेले कर्जाचे ओझे उतरवले. सध्या सोशल मीडियावर या दोन मित्रांच्या घट्ट मैत्रीची आणि प्रामाणिकपणाची मोठी चर्चा रंगली असून नेटिझन्स इस्माईल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *