Nepal Crisis: नेपाळमधील तरुणांचा वाढता संताप पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. गेल्या तीन दिवसांत, तीन तरुणांनी पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण गंभीररित्या भाजल्याने रुग्णालयात दाखल आहे. पंतप्रधान बलेंद्र शाह “बालेन” यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. राजधानी काठमांडूमध्ये तरुण आंदोलन करत आहेत, तर विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने सरकारवर तरुणांमध्ये आशा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
बालेन शाह यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप
झेन-जी नेपाळ संघटनेने पंतप्रधान बालेन शाह यांच्यावर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, तरुणांचा रोजगार आणि उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्प आणि धोरणांमध्ये कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. 2023 मध्ये प्रेम आचार्य यांनी केलेल्या आत्मदहनाची घटनाही चर्चेत आहे. त्यावेळी काठमांडूचे महापौर असलेल्या बालेन शाह यांनी या घटनेला शासनाचे संपूर्ण अपयश म्हटले होते. आता, सध्याच्या घटनांवरील त्यांचे मौन विरोधी पक्ष आणि आंदोलकांच्या निशाण्यावर आले आहे. नेपाळमधील या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे तरुणांची मानसिकता, बेरोजगारी आणि सरकारी धोरणांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा असा विश्वास आहे की, जर सरकारने लवकरच प्रभावी कारवाई केली नाही, तर आंदोलने अधिक तीव्र होऊ शकतात.
GenZ आंदोलनांमध्ये बालेन हे आंदोलनाचा चेहरा बनले
2022 मध्ये महापौर झाल्यानंतर, बालेन यांनी शहर स्वच्छ करण्यासाठी, वारसा जतन करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाईमुळे वाहतूक सुधारली, परंतु यामुळे विशेषतः रस्त्यावरील विक्रेते आणि झोपडपट्टीवासीयांकडून विरोधही झाला. बालेन शाह यांचा प्रभाव केवळ प्रशासनापुरता मर्यादित नव्हता. गेल्या वर्षी सप्टेंबरमधील आंदोलनादरम्यान त्यांची गाणी तरुणांच्या मनात घर करून राहिली. सोशल मीडियावरील बंदी, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यांवरील जनतेच्या संतापाने या आंदोलनांना खतपाणी घातले, ज्यात 77 लोकांचा मृत्यू झाला. आंदोलकांनी त्यांचे ‘नेपाळ हंसेको’ हे गाणे एक प्रतीक म्हणून स्वीकारले.
4 मार्च रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाने प्रचंड विजय मिळवून नेपाळच्या पारंपरिक राजकीय पटलाला मोठा धक्का दिला. बालेन शाह यांनी झापा-5 मतदारसंघातून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा पराभव करून आपले राजकीय सामर्थ्य सिद्ध केले. वयाच्या 35 व्या वर्षी पदभार स्वीकारून ते नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा