प्रत्येक प्रवासप्रेमी हा ट्रिप अविस्मरणीय करण्यासाठी नेहमीच नवीन ठिकाणे आणि अनोख्या अनुभवांच्या शोधात असतात. त्यातच तुम्हाला जर निसर्गाच्या जवळ जायचं आहे, तेही हटके अंदाजात तर तुमच्या ट्रिप प्लॅनमध्ये रोपवेच्या सफरींचा समावेश करा. ज्यात तुम्हाला नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. आसपासचा सुंदर निसर्ग, सुर्यास्त, उंच डोंगर तुम्हाला रोपवे मधून पाहायला मिळतं. म्हणूनच देशभरातील अनेक पर्यटन स्थळांवर रोपवे पर्यटकांमध्ये इतके लोकप्रिय आहेत.
रोपवेचा प्रवास केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर तो संपूर्ण प्रवासाला एक अद्भुत अनुभव देतो. केबल कारमध्ये बसून आजूबाजूच्या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य, हिरवीगार डोंगर, खोल दऱ्या आणि सुंदर वसलेली गावं हे दृश्ये पाहणे हा एक खरोखरच आनंददायी अनुभव आहे. अनेक ठिकाणी डोंगराळ भागांमध्ये सहज पोहोचण्यासाठी रोपवे एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देतात. चला तर मग आजच्या लेखात आपण भारतातील सुंदर पर्यटन स्थळे जाणून घेऊया जिथे रोपवे उपलब्ध आहेत, त्यांची खास वैशिष्ट्ये आणि तुमच्या प्रवासादरम्यान लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे ही जाणून घेऊयात.
भारतातील या 5 प्रसिद्ध रोपवेचा आनंद नक्की घ्या
गुलमर्ग गोंडोला (गुलमर्ग, जम्मू आणि काश्मीर)
गुलमर्ग गोंडोला हा जगातील सर्वात उंच आणि लोकप्रिय रोपवेपैकी एक मानला जातो. जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग येथे असलेला हा रोपवे पर्यटकांना दोन टप्प्यांत बर्फाच्छादित पर्वतांवर घेऊन जातो. येथून अफारवत शिखर आणि आजूबाजूच्या हिमालयीन दऱ्यांची मनमोहक दृश्ये पाहता येतात.
औली रोपवे (औली, उत्तराखंड)
उत्तराखंडमधील जोशीमठ आणि औली यांना जोडणारा हा रोपवे देशातील सर्वात लांब रोपवेपैकी एक आहे. या प्रवासात नंदा देवीसह अनेक बर्फाच्छादित शिखरांची विहंगम दृश्ये पाहायला मिळतात. हिवाळ्यात बर्फ आणि स्कीइंगचा अनुभव मिळत असल्यामुळे पर्यटकांसाठी हा एक लोकप्रिय पर्याय आहे.
गन हिल रोपवे (मुस्सोरी, उत्तराखंड)
गन हिल रोपवे उत्तराखंडमधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या मसुरीमध्ये आहे. हा रोपवे पर्यटकांना अवघ्या काही मिनिटांत गन हिल व्ह्यूपॉइंटवर घेऊन जातो, जिथून मसुरी शहर, दून व्हॅली आणि आजूबाजूच्या टेकड्यांचे नयनरम्य दृश्य दिसते.
गिरनार रोपवे (जुनागड, गुजरात)
गुजरातच्या जुनागढमध्ये असलेला गिरनार रोपवे हा आशियातील सर्वात लांब रोपवेपैकी एक मानला जातो. यामुळे यात्रेकरू आणि पर्यटकांना गिरनार पर्वतावर सहज पोहोचता येते. या प्रवासात पर्वत, जंगल आणि नैसर्गिक सौंदर्याची विहंगम दृश्ये पाहायला मिळतात.
दार्जिलिंग रोपवे (दार्जिलिंग, पश्चिम बंगाल)
दार्जिलिंग रोपवे ज्याला रंगीत व्हॅली पॅसेंजर केबल कार म्हणूनही ओळखले जाते, जे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये आहे. हा रोपवे हिरवीगार चहाची लागवड, खोल दऱ्या, घनदाट जंगले पाहायला मिळतात. जेव्हा येथील वातावरण चांगले असते तेव्हा येथून हिमालयाच्या शिखरांची विहंगम दृश्ये दिसतात. नैसर्गिक सौंदर्य आणि साहसाचा संगम शोधणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक लोकप्रिय मार्ग आहे.
सर्वोत्तम वेळ आणि तिकिटाबद्दलची माहिती
रोपवेने प्रवास करण्याची सर्वोत्तम वेळ सहसा पहाटे किंवा संध्याकाळची असते, जेव्हा हवामान आल्हाददायक असते आणि आजूबाजूचा परिसर अधिक स्पष्टपणे दिसतो. पावसाळ्यात डोंगराळ भागात खराब हवामानामुळे रोपवे सेवा तात्पुरती स्थगित केली जाऊ शकते.
प्रत्येक रोपवेचे तिकीट दर अंतर आणि ठिकाणानुसार वेगवेगळे असतात. अनेक ठिकाणी ऑनलाइन तिकीट बुकिंगची सोय आहे, तर काही ठिकाणी तिकीट काउंटरवरही तिकीट खरेदी करता येते. प्रवास करण्यापूर्वी कृपया संबंधित रोपवेची अधिकृत वेबसाइट किंवा स्थानिक माहिती तपासा.
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
रोपवेमधून प्रवास करताना सर्व सुरक्षा सूचनांचे पालन करा आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करा. चालत्या केबिनमध्ये उभे राहणे, झोके घेणे किंवा बाहेर वाकणे टाळा. लहान मुलांवर नेहमी लक्ष ठेवा आणि त्यांना कधीही एकटे सोडू नका.
खराब हवामान किंवा जोरदार वाऱ्यामुळे रोपवेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी हवामानाची माहिती नक्की तपासा. जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल किंवा एखादी गंभीर आरोग्य समस्या असेल, तर प्रवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम.