Last Updated:
नांदेड शहराला हादरवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं पुतणीच्या प्रेम प्रकरणात अडथळा निर्माण करणं, एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे.
नांदेड शहराला हादरवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं पुतणीच्या प्रेम प्रकरणात अडथळा निर्माण करणं, एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. पुतणीच्या प्रियकराने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून प्रेयसीच्या चुलत्याची निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी दांडा नसलेली कुऱ्हाड सोबत आणून अचानक हल्ला केला. ज्यात प्रेयसीच्या चुलत्याने प्राण गमवावे लागले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
ही घटना नांदेड शहरातील सांगवी परिसरातील आसना पुलाजवळ शुक्रवारी मध्यरात्री घडली. सचिन यशवंत काळे (रा. नुरी चौक, नांदेड) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. हे हत्याकांड उघडकीस येताच घटनेचं गांभीर्य ओळखून विमानतळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या ६ तासांत मुख्य संशयितासह त्याच्या तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सचिनच्या अल्पवयीन पुतणीचे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील रहिवासी असलेल्या राजेश दत्ता राजेगोरे (२२) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या महिन्यात या दोघांनी घरातून पळ काढला होता. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र, अवघ्या २४ तासांतच ती मुलगी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाली आणि तिने मी मामाच्या गावी गेले होते, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांमार्फत तिचे समुपदेशन करून तिला पालकांच्या ताब्यात दिलं. परंतु, या घटनेमुळे मुलीचे काका सचिन काळे आणि राजेश राजेगोरे यांच्यात वाद सुरू होता.
‘वाद मिटवूया’ म्हणत रचला मृत्यूचा सापळा
गेल्या महिनाभरापासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. हा वाद नेहमीसाठी संपवण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपी राजेश याने सचिनला मध्यरात्री सांगवीजवळील आसना ब्रिजवर चर्चेसाठी बोलावले. “जे होईल ते होईल, आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू”, असं म्हणत त्याने सचिनला विश्वासात घेतलं. मात्र, तो सचिनचा समेट घडवण्याचा नाही, तर त्याचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित कट होता.
खिशात लपवलेली बिनदांड्याची कुऱ्हाड अन् जीवघेणा हल्ला
आरोपींनी कट इतका पूर्वनियोजित रचला होता की, कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी सोबत दांडा नसलेली लोखंडी कुऱ्हाड आणली होती. ती कुऱ्हाड खिशात लपवून आणली होती. आसना पुलावर वाद वाढताच राजेश आणि त्याच्या साथीदारांनी ती कुऱ्हाड हातात घट्ट धरून सचिनच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सचिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दाखवली तत्परता; ६ तासांत आरोपी गजाआड
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच विमानतळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी अवघ्या ६ तासांत चारही आरोपींना वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेतलं. राजेश दत्ता राजेगोरे (वय २२, मुख्य आरोपी), बालाजी राजेगोरे (वय २१), आत्माराम कदम (वय २०) आणि आणखी एक साथीदार अशा चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Nanded,Maharashtra
प्रेम प्रकरणातून नांदेडमध्ये रक्तरंजित थरार, प्रेयसीच्या चुलत्याची कुऱ्हाडीने हत्या, मध्यरात्री भेटायला बोलवलं अन् घात केला
