Last Updated:
उत्तर प्रदेशातील हापूर येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत कथितरित्या ॲसिड आढळल्याने खळबळ उडाली आहे. बाटलीतील द्रवाचे दोन घोट पिताच एका तरुणीची प्रकृती गंभीर बिघडली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हापूर: उत्तर प्रदेशातील हापूर येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत पाण्याऐवजी कथितरित्या ॲसिड आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बाटलीतील द्रवाचे दोन घोट पिताच एका तरुणीची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे सीलबंद पाण्याच्या बाटल्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हापूरमधील अर्जुन नगर परिसरात राहणारी रिया ही आपल्या आई अंजना राघव यांच्यासोबत जवळच्या सराफाच्या दुकानात दागिने खरेदीसाठी गेली होती. खरेदीदरम्यान रियाला तहान लागल्याने तिने पाणी मागितले. त्यानंतर सराफाने शेजारील जनरल स्टोअरमधून एका नामांकित ब्रँडची पूर्णपणे सीलबंद आणि थंड पाण्याची बाटली मागवली.
रियाने बाटली उघडून पाण्याचे अवघे दोन घोट घेतले आणि काही क्षणांतच तिची प्रकृती बिघडू लागली. तिला उलट्या होऊ लागल्या आणि ती अस्वस्थ झाली. त्यानंतर तिला तातडीने मेरठ येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यामध्ये रिया बाटली उघडून पाणी पिताच काही क्षणांत अस्वस्थ झाल्याचे दिसून येते. त्यानंतर ती घाईघाईने तेथून बाहेर पडताना दिसते. घटनेनंतर बाटलीतील उरलेला द्रव जमिनीवर ओतून पाहण्यात आला. त्यावेळी तीव्र रासायनिक वास येऊ लागला आणि फेसही तयार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जमिनीवरही ॲसिड पडल्याप्रमाणे डाग पडल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित जनरल स्टोअरच्या मालकिणी रेनू अग्रवाल यांनी सांगितले की, एक मुलगा पाण्याची बाटली घेण्यासाठी दुकानात आला होता. त्यांनी डीप फ्रीजमधून बाटली काढून त्याला दिली. काही वेळाने संबंधित लोक परत आले आणि बाटलीत पाण्याऐवजी ॲसिड असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या दुकानात ॲसिडची विक्रीच होत नसल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यांनुसार बाटली पूर्णपणे सीलबंद होती. बाटली पाहून ती पाण्याची नसल्याचा संशय त्यांनाही आला नाही तसेच बाटली घेऊन गेलेल्या मुलालाही किंवा ती पिणाऱ्या तरुणीलाही काहीच संशय आला नव्हता.
या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जर बाटली खरोखरच पूर्णपणे सीलबंद होती तर तिच्यामध्ये ॲसिडसारखा घातक पदार्थ कसा पोहोचला? हा उत्पादन प्रक्रियेत झालेला निष्काळजीपणा आहे का? की बनावट ब्रँडच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे, याची चौकशी सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत असून सराफ, जनरल स्टोअरची मालकीण आणि बाटली आणणाऱ्या मुलाची चौकशी केली जात आहे. तसेच संबंधित बाटली तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामधील द्रव नेमका कोणता होता आणि हा प्रकार कसा घडला, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 11, 2026 10:38 PM IST
विकत घेतली सीलबंद बाटली,पाण्याऐवजी निघाले ॲसिड; दोन घोट पिताच तरुणीची प्रकृती बिघडली, Video
