12 व्या वर्षी जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, तरीही नशिबाने दिली नाही साथ, आज रिक्षा चालवून जीवन जगतोय हा अभिनेता – Marathi News | National award winning actor Shafiq Syed auto driver


मुंबईच्या रस्त्यांवरून थेट राष्ट्रीय पुरस्कार आणि ऑस्कर-नामांकित चित्रपटापर्यंतचा प्रवास करणारे शफीक सय्यद यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे वाटते. मात्र, मोठे यश मिळूनही त्यांना चित्रपटसृष्टीत अपेक्षित संधी मिळाली नाही. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही कामासाठी स्टुडिओंचे उंबरठे झिजवावे लागले आणि अखेर उदरनिर्वाहासाठी त्यांनी ऑटो-रिक्शा चालवण्याचा व्यवसाय स्वीकारला.

1980 च्या दशकात शफीक सय्यद हे बेंगळुरूमधील घरातून पळून तिकीटाशिवाय मुंबईत आले. बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवली जाणारी मुंबई प्रत्यक्षात कशी आहे, हे पाहण्याची त्यांची इच्छा होती. मुंबईत आल्यानंतर ते चर्चगेट स्थानकाजवळील रस्त्यांवर राहत होते.

याच काळात एका महिला कास्टिंग एजंटने त्यांच्याशी संपर्क साधला. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना अभिनय कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये देण्याची ऑफर तिने दिली. अनेक मुलांना हा प्रकार फसवणुकीचा वाटल्याने ते पळून गेले. मात्र, भुकेल्या शफीक यांनी ती संधी स्वीकारली. त्याच कार्यशाळेतून त्यांची निवड दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटातील प्रमुख बालभूमिकेसाठी झाली.

‘सलाम बॉम्बे’ मुळे मिळाली ओळख

1988 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सलाम बॉम्बे’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाला सर्वोत्तम परदेशी भाषेतील चित्रपट या विभागात ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. तसेच चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकले. शफीक यांच्या अभिनयाचेही मोठे कौतुक झाले आणि त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यशामुळे आता अभिनय क्षेत्रात मोठ्या संधी मिळतील, अशी शफीक यांना आशा होती. मात्र, वास्तव पूर्णपणे वेगळे ठरले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही शफीक यांना कोणत्याही मोठ्या चित्रपटात काम मिळाले नाही. कामाच्या शोधात त्यांनी अनेक चित्रपट स्टुडिओंचे उंबरठे झिजवले. स्वतःबद्दल प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रांच्या कात्रणांसह ते निर्माते-दिग्दर्शकांच्या कार्यालयात जात असत.

2010 मध्ये ‘ओपन’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, अनेकदा कनिष्ठ सहाय्यक दिग्दर्शक त्यांच्या वर्तमानपत्रातील कात्रणांकडे पाहत आणि त्यांना फक्त, आज जेवलात का? असा प्रश्न विचारत. त्यांनी अनेक प्रयत्न केले, पण कोणीही अभिनयाची संधी दिली नाही.

पुन्हा बेंगळुरूला परतावे लागले

सततच्या अपयशामुळे अखेर शफीक यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि बेंगळुरूला परतले. कुटुंबातील पाच सदस्यांचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे अभिनयाचे स्वप्न बाजूला ठेवून त्यांनी ऑटो-रिक्शा चालवण्यास सुरुवात केली. त्या काळात त्यांची दिवसाची कमाई अवघी 150 रुपये होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *