Jalna Crime News: जालना शहरातील औद्योगिक परिसरामध्ये (Industrial Area) भरदिवसा गुंडगिरी आणि भाईगिरीचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणीला जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवण्यासाठी एका माथेफिरू तरुणाने थेट बस अडवून धुडगूस घातला. एवढेच नाही तर या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या खाजगी बस चालकाला (Bus Driver) या तरुणाने अमानुषपणे मारहाण केली आहे. हा संपूर्ण थरार बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि चालकाच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalna Crime News: चालती बस अडवून धुडगूस
मिळालेल्या माहितीनुसार, सदर खाजगी बस ही जालना औद्योगिक परिसरातून जात असताना आरोपी तरुणाने बस रोखली. बस थांबताच तो थेट आत घुसला आणि एका प्रवासी तरुणीला जबरदस्तीने खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील इतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Jalna Crime News: चालकाला बेदम मारहाण
तरुणाने बसमध्ये सुरू केलेल्या या गुंडगिरीला जेव्हा बस चालकाने विरोध केला आणि जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीचा पारा चांगलाच चढला. त्याने चालकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच चालकाने स्वतःच्या मोबाईलमध्येही या तरुणाच्या प्रतापचे रेकॉर्डिंग केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Jalna Crime News: बदनापूर पोलिसांत गुन्हा दाखल
या संपूर्ण घटनेची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे बदनापूर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. भररस्त्यात एका तरुणीची छेड काढत चालकाला मारहाण करणाऱ्या या गुंडाला लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आता प्रवासी आणि नागरिकांमधून केली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या