आधी आई-वडील गेले; आता लेकीलाही पाण्यानं ‘गिळलं’, मामाच्या गावात भयंकर घडलं, कोल्हापूर हळहळलं! | कोल्हापूर बातम्या


Last Updated:

Kolhapur News: मृत्यूच्या दारातून परतलेल्या प्रियाने वडिलांना पाहताच हंबरडा फोडला. “बाबा, मी वाचले, पण आपली कविता गेली हो..” हे शब्द ऐकून घाटावरच्या सगळ्यांचेच डोळे पाणावले.

आधी आई-वडील गेले; आता लेकीलाही पाण्यानं 'गिळलं', मामाच्या गावात भयंकर घडलं, कोल्हापूर हळहळलं!
आधी आई-वडील गेले; आता लेकीलाही पाण्यानं ‘गिळलं’, मामाच्या गावात भयंकर घडलं, कोल्हापूर हळहळलं!

कोल्हापूर: आई-वडिलांचं छत्र हरपलेलं. 10 वर्षांची चिमुकली कविता शिरोळला मामाकडेच राहायची. पण, शुक्रवारची सकाळ पुन्हा काळ बनूनच उगवली. कविता आणि मामाची प्रिया दोघी चिमुकल्या आजोबांसोबत कृष्णा नदीवर गेल्या. पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या. पण पाण्याचा अंदाज नव्हता. दोघी बुडू लागल्या. मुलींना वाचवण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली. प्रियाला कसंबसं बाहेर काढलं. पण मामाच्या छायेत वाढणाऱ्या कविताचा मृतदेहच हाती लागला. आई-वडिलांनंतर लेकीचाही दुर्दैवी अंत झाला.

शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. कृष्णा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन चिमुरड्या मुली पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्या. नागरिकांच्या सतर्कतेमुळे एकीला वाचवण्यात यश आले असून दुसरीचा थेट मृतदेहच सापडला. कविता विठ्ठल साळुंखे (वय 10, मूळगाव कालवाडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तर प्रिया कालिदास चव्हाण हिला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

नेमकं घडलं काय?

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी बापू शंकर चव्हाण हे नेहमीप्रमाणे कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत प्रिया आणि कविता या दोन्ही नातीही गेल्या होत्या. बापू हे काठावर कपडे काढून ठेवत होते. तेव्हाच प्रिया आणि कविता पोहण्यासाठी नदीत उतरल्या. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्या नदीपात्रात बुडू लागल्या.

दोन्ही मुलींना बुडताना पाहून बापू चव्हाण यांच्यासह इतरांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नांनी प्रियाला वाचवण्यात यश आलं. तिला पाण्याच्या बाहेर काढलं. मात्र, कविताचा मृतदेहच हाती लागला. मृत्यूच्या दारातून परतलेल्या प्रियाने वडिलांना पाहताच हंबरडा फोडला. “बाबा, मी वाचले, पण आपली कविता गेली हो..” हे शब्द ऐकून घाटावरच्या सगळ्यांचेच डोळे पाणावले.

दरम्यान, याबाबत कालिदास बापू चव्हाण यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. दुपारी जयसिंगपूर येथील पोलीस ठाण्यात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा कर्नाटकातील बीदर जिल्ह्यात मृत कविता हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आधी आई-वडिलांचं निधन आणि…

मृत कविता ही मूळची बीदर जिल्ह्यातील कालवाडी गावची होती. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने ती मामाकडेच राहात होती. मामा शंकर चव्हाण हेच तिचा सांभाळ करत होते. आता कविताचाही असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चव्हाण आणि साळुंके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होतेय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *