ITR 2026 : फक्त 24 रूपयांमध्ये भरा आयकर रिटर्न, फोनवरून क्षणात होईल काम – Marathi News | Itr 2026 file income tax return for rs 24 via phonepe jio finance taxbuddy


तुम्ही आयकर रिटर्न भरला नसेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता ITR भरण्यासाठी आयकर विभागाच्या पोर्टलवर जाण्याची गरज राहणार नाही. फोनपे आणि जिओ फायनान्स यांनी आपल्या अॅपमध्येच ITR फाइलिंगची सुविधा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या सेवेची सुरुवातीची किंमत फक्त 24 रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, केवळ 24 रुपयांत तुम्ही तुमचा ITR भरू शकता. तसेच गरज भासल्यास तज्ज्ञांची मदतही घेऊ शकता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

31 जुलै ही ITR भरण्याची अंतिम तारीख

31 जुलैच्या ITR फाइलिंगच्या अंतिम मुदतीपूर्वी फिनटेक कंपन्या फोनपे आणि जिओ फायनान्स यांनी करदात्यांसाठी ही नवी सेवा सुरू केली आहे. दोन्ही कंपन्यांनी TaxBuddy सोबत भागीदारी करून त्यांच्या अॅपमध्येच आयकर रिटर्न भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना वेगळ्या वेबसाइट किंवा पोर्टलवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

मोबाईलवरूनच भरता येणार ITR

ही सेवा केवळ पगारदार कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर व्यावसायिक, उद्योजक आणि विविध स्त्रोतांतून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींसाठीही उपयुक्त आहे. ज्यांचे उत्पन्न केवळ पगारापुरते मर्यादित नसून व्यवसाय, भांडवली नफा, क्रिप्टोकरन्सी, परदेशी उत्पन्न किंवा F&O ट्रेडिंगमधूनही मिळते, अशा करदात्यांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. दोन्ही अॅप्समध्ये ‘डू-इट-युअरसेल्फ’ आणि करतज्ज्ञांच्या मदतीने ITR भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. स्वतः ITR भरणाऱ्या प्लॅनची सुरुवातीची किंमत फक्त 24 रुपये आहे. तर गुंतागुंतीच्या करप्रकरणांसाठी तज्ज्ञांची मदत घेतल्यास वेगळे शुल्क आकारले जाईल.

फक्त 24 रुपयांत ITR फाइल

जिओ फायनान्सने आपल्या शुल्कांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. पगारदार व्यक्तींसाठी प्लॅन 24 रुपयांपासून 499 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर कॅपिटल गेन, क्रिप्टो किंवा F&O उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी प्लॅनची सुरुवात 99 रुपयांपासून होते. तज्ज्ञांच्या मदतीने ITR भरायचा असल्यास शुल्क 649 रुपयांपासून ते 2,924 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे तुम्हालाही आयकर भरायचा असेल तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जाऊन फोनद्वारे अवघ्या काही मिनिटांमध्ये आयकर भरू शकता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *