तुकाराम मुंढेंची चित्रपटसृष्टीत एन्ट्री, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाची मागणी, धाबे दणाणार; आता थेट शुटिंगच्यावेळीच… – Marathi News | Rashtrawadi submits a memorandum to Tukaram Mundhe regarding the issue of food safety on film and TV serial sets


महाराष्ट्रातील मराठी, हिंदी तसेच इतर भाषांतील मालिका, चित्रपट आणि वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, या प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी करून अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर मालिका, चित्रपट आणि वेब मालिकांचे चित्रीकरण सुरू असते. या चित्रीकरणामध्ये हजारो कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक कर्मचारी आणि इतर कर्मचारी सलग 12 ते 16 तास किंवा त्याहून अधिक काळ काम करतात. अशा परिस्थितीत त्यांना दर्जेदार, स्वच्छ, पौष्टिक आणि सुरक्षित अन्न मिळणे अत्यावश्यक असून, ती संबंधित निर्मिती संस्था आणि केटरिंग सेवा पुरवठादारांची कायदेशीर तसेच नैतिक जबाबदारी असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

मात्र, अनेक चित्रीकरण स्थळांवर कलाकार व तंत्रज्ञांना निकृष्ट दर्जाचे, अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक अन्न पुरविले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही ठिकाणी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम (FSSAI) अंतर्गत निर्धारित नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही निदर्शनास येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांना निवेदन

यापार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरातील सर्व चित्रपट, मालिका आणि वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर अचानक तपासणी मोहीम राबवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच कलाकार व तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासावी आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित केटरिंग कंत्राटदार, निर्मिती संस्था तसेच जबाबदार व्यक्तींवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, सर्व चित्रीकरण स्थळांसाठी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, साठवण व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वयंपाकगृहाची स्वच्छता तसेच अन्न वितरण प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. अन्नसुरक्षा नियमांचे नियमित पालन होत आहे की नाही, यासाठी वेळोवेळी विशेष तपासणी व निरीक्षण मोहिमा राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, कलाकार आणि तंत्रज्ञ हे मनोरंजन उद्योगाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन राज्यभर प्रभावी तपासणी मोहीम राबवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करून चित्रीकरण स्थळांवर सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपुरवठा सुनिश्चित करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *