Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोत झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेत (Building Collapse) जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांच्या शौर्याची एक अत्यंत थरारक गोष्ट समोर आली आहे. या दुर्घटनेच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाचे (Fire Brigade) जवान अनिल वाघ (Anil Wagh) हे खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरले आहेत. त्यांना पुंडलिक भुतापल्ले यांच्यासह इतर तीन सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत मोलाची साथ दिली.
Moshi Building Collapse: सलग 14 तास मृत्यूच्या छायेत बचावकार्य
काल बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडल्यापासून बचाव पथक युद्धपातळीवर कार्यरत आहे. जवान अनिल वाघ आणि त्यांच्या टीमने दोन टप्प्यांत सलग 14 तास इमारतीच्या आत राहून रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation) राबवले. काल दुपारी 2 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत आणि आज सकाळी पुन्हा 9:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत हे जवान मृत्यूच्या छायेत काम करत होते.
Moshi Building Collapse: आत ऑक्सिजन नाही, कचऱ्याची भिंत; तरीही जवानांचे पाऊल मागे हटले नाही
इमारतीच्या आतील परिस्थिती अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारी होती. कोसळलेल्या स्लॅब आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे श्वासोच्छ्वास घेण्यासाठी आत अजिबात ऑक्सिजन शिल्लक नव्हता. अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचायचे तर कचऱ्याच्या अवाढव्य डोंगराने रस्ता पूर्णपणे अडवला होता. अशा अत्यंत प्रतिकूल आणि विषारी वायूच्या वातावरणातही अनिल वाघ आणि त्यांचे सहकारी मागे हटले नाही.
Moshi Building Collapse: मृत्यूच्या दारातून 9 जणांना खेचून आणले
जिद्दीने हे जवान पुढे सरकत राहिले. एअरबॅगच्या साहाय्याने जागा करत, कचरा बाजूला सारत त्यांनी थेट अडकलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आणि एकामागून एक तब्बल 9 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना नवे जीवदान दिले. अंगावर ढिगारा कोसळण्याचा आणि गुदमरून मृत्यू होण्याचा थेट धोका असतानाही, या जवानांनी दाखवलेले हे शौर्य सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे.
Moshi Building Collapse: कंत्राटदाराला ‘क्लीन चीट’ देण्याची आयुक्तांना घाई का?
एकीकडे जवान आतमध्ये विषारी वायू आणि कचऱ्याच्या प्रचंड उष्णतेशी लढा देत असतानाच, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या एका विधानामुळे मोठा संताप व्यक्त होत आहे. “मोशी इमारत दुर्घटना ही नैसर्गिक आहे, त्यामुळे कोणालाही दोषी धरता येणार नाही,” असे वक्तव्य करत आयुक्तांनी आपले हात वर केले आहेत. इमारत धोकादायक रित्या उभारण्यात आली होती का? इमारतीला पुरेशी सुरक्षा भिंत होती का? या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार का? यांसारखे थेट प्रश्न माध्यमांनी विचारले असता आयुक्तांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे कंत्राटदार असलेल्या ‘अँटोनी लारा रिन्यूएबल एनर्जी’ यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना तातडीने क्लीन चीट देण्यासाठी आयुक्त एवढी घाई का करत आहेत? असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ चोवीस तासांच्या आत आयुक्तांनी घेतलेल्या या भूमिकेमागे मोठा राजकीय दबाव असल्याचे बोलले जात आहे.
आणखी वाचा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून