Last Updated:
Sanjay Raut : एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल झालेल्या हायव्होल्टेज भेटीमुळे आता महाविकास आघाडीत (MVA) उघडपणे वादाची ठिणगी पडल्याचे दिसून आले आहे.
मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल झालेल्या हायव्होल्टेज भेटीमुळे आता महाविकास आघाडीत (MVA) उघडपणे बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांवर थेट आणि अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला. “ज्या गद्दारांनी आपले सरकार पाडले, त्यांच्या छताखाली जाऊन पक्षाच्या बैठका घेतल्याने मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते,” अशा सणसणीत शब्दांत राऊतांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.
‘त्या’ बैठकीमुळे ठाकरे गट संतप्त
काल शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, केवळ भेटच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दालनातच शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बंद दाराआड बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी पवारांच्या ‘निर्णयावर’ आणि राष्ट्रवादीच्या ‘विश्वासार्हतेवर’ थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“आम्ही एवढे सहिष्णू नाही, आमचं मन एवढं मोठं नाही!”
संजय राऊत पुढे म्हणाले, “शरद पवार हे नक्कीच मोठे आणि आदरणीय नेते आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, त्यांच्या दारात जाण्याची काय गरज होती? अख्खं विधानभवन काय ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. आम्ही एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या भावनेतून बोलत आहोत. गद्दारांच्या ठिकाणी जाऊन आपल्या पक्षाच्या बैठका घेण्याएवढे आम्ही सहिष्णू नाही आणि आमचं मनही एवढं मोठं नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटले.
“आम्ही अजित पवारांच्या दालनात बैठक घेतली नसती!”
राऊतांनी अजित पवारांचा संदर्भ देत म्हटले की, “आम्ही जर असतो तर अजित पवार यांच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक कधीही घेतली नसती. त्यांनी (अजित पवारांनी) शरद पवारांशी बेइमानी केली, हे आम्ही विसरलेलो नाही. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाने काही पथ्य पाळायलाच हवीत, असे त्यांनी म्हटले.
Mumbai,Maharashtra
Jul 09, 2026 11:34 AM IST
Sharad Pawar Sanjay Raut: मविआमध्ये मोठा भडका! “शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देतायत, त्यांची विश्वासार्हता…”; संजय राऊतांचा थेट हल्ला
