राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश


सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर पुन्हा एकदा महापालिकांमध्ये (sangli) नगरसेवकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. मात्र, सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये (mahapalika) राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा हादरा बसला आहे. मिरजेतील प्रभाग 20 मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. पूर्वाश्रमीच्या अश्विनी दत्तात्रय कांबळे या नावाने त्यांना यापूर्वी देण्यात आलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र (cast certificate) तात्काळ जप्त करण्याचे आदेश पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने दिले आहेत. या आदेशाचे प्रत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.  

पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती समितीच्या या निर्णयामुळे नगरसेविका अश्विनी कोळी यांचे नगरसेवक पद रद्द केले जाणार आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून प्रभाग 20 मधून अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या गटामध्ये अश्विन कोळी यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या निवडून देखील आल्या आहेत. येथे अश्विनी कोळी या विजयी झाल्या होत्या आणि शिवसेनेचे उमेदवार विकास सूर्यवंशी यांना दोन नंबरची मते मिळाली होती. मात्र नगरसेविका अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी केल्यानंतर अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 20 हा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव होता. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून अश्विनी कोळी यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लढलेल्या माजी नगरसेविका स्वातीताई पारधी यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. ​परंतु, अश्विनी कोळी यांनी सादर केलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र बनावट आणि संशयास्पद असल्याचा आक्षेप स्वातीताई पारधी यांनी घेतला होता. लोकशाही आणि कायद्याचा आदर राखत पारधी यांनी याविरोधात ‘अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे’ यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची सखोल चौकशी आणि सुनावणी समितीसमोर सुरू होती. ​स्वातीताई पारधी यांनी सादर केलेले पुरावे, कागदपत्रे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून पुणे जात पडताळणी समितीच्या संचालकांनी आज अखेर आपला अंतिम निकाल घोषित केला. 

जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द

समितीने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, “अश्विनी दत्तात्रय कांबळे यांचा ‘कोळी महादेव’ अनुसूचित जमातीचा दावा अवैध घोषित करण्यात येत आहे. तसेच उपविभागीय अधिकारी, पंढरपूर, जि. सोलापूर यांनी दिनांक 23/01/2025 अन्वये निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द आणि जप्त करण्यात येत आहे.” जात पडताळणी समितीच्या या निकालामुळे आता महापालिका प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अश्विनी कोळी यांच्या नगरसेवकपदावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

हेही वाचा

Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *