Missing Link Mumbai Pune Expressway: महायुती सरकारच्या काळात मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Expressway) मिसिंग लिंकवर सोमवारी दरड कोसळल्याची घटना घडली होती. मिसिंग लिंक (Missing Link) सुरु होऊन अवघे काही दिवस उलटले असतानाच तेथील रस्त्यांवर खड्डे पडल्याचेही समोर आले होते. यामध्ये भर म्हणून काल मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटवर दरड कोसळून 100 टन माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे महायुती सरकारकडून ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ म्हणवल्या जाणाऱ्या मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना घेरले होते. या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी अभूतपूर्व पाऊस आणि बदललेल्या निसर्गचक्राचे कारण देत प्रत्युत्तर दिले होते. यावरुन सोमवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला होता. या सगळ्या वादात आता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन महायुती सरकारला डिवचले आहे.
मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्याला नेहरूंच जबाबदार आहेत आणि तरीसुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावे, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. महायुती सरकारमधील भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा देशाच्या अधोगतीचे आणि मागे पडण्याचे खापर काँग्रेसचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरला नेहरु यांच्यावर फोडले जाते. हाच धागा पकडत संदीप देशपांडे यांनी मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.
दरड कोसळल्यामुळे सोमवारी दिवसभर मिसिंग लिंकवरील मुंबई आणि पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली होती. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करुन मिसिंग लिंकवरील ढिगारा हटवल्याचा व्हिडीओ ट्विट करत या मार्गावरील वाहतूक सुरु झाल्याचे सांगितले होते.
मिसिंग लिंक वर दरड कोसळली त्याला नेहरूंच जबाबदार आहेत आणि तरीसुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तान ला निघून जावे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 7, 2026
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मिसिंग लिंकवरील दुर्घटनेबाबत काय म्हणाले?
मुंबई-पुणे मार्गावर दरड कोसळली. या सगळ्या घटना निसर्गाचे चक्रं बदलल्यामुळे घडत आहेत. प्रशासनाने सगळी तयारी केली होती, पण त्याच्या विपरीत घटना घडत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. जशी कनेक्टिंक लिंकला दरड कोसळल्यानंतर लगेच वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई आणि पुणे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली किंवा वळवण्यात आली. राज्य सरकार आणि यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर 100 टन ढिगारा रस्त्यावर आला. ही दरड अशा भागात कोसळली की, जिथे यापूर्वी कधीच दरड कोसळली नव्हती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
आणखी वाचा