मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी ‘चर्चा’ होणार


मुंबई : राज्याच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत (Mumbai) गेल्या तीन दिवसांपासून अति मुसळधार पाऊस (Rain) सातत्याने कोसळत असून गेल्या 48 तासांत शहर विभागात 300 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 380 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरांत 345 मिलीमीटर पावसाची नोंद  झाली आहे. या विक्रमी पर्जन्यामुळे आणि ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणा-या वादळी वा-यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत परिस्थितीवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, 9 जुलै रोजी विशेष महासभा बोलवण्यात आली असून पावसाळी दुर्घटनांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. 

झाडे व फांद्या कोसळणे, शॉर्टसर्किट, धोकादायक इमारतींचे अंशतः किंवा पूर्णतः भाग कोसळणे तसेच इतर आपत्कालीन घटनांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. सखल भागांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे उदंचन पंप, डी-वॉटरिंग यंत्रणा आणि अतिरिक्त मनुष्यबळ सातत्याने कार्यरत आहे. तसेच बचाव साहित्य, यंत्रसामग्री आणि आवश्यक संसाधने पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांकडून समन्वित आणि वेगवान कार्यवाही सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रासाठी शनिवार (दि. 4 जुलै), रविवार (दि. 5 जुलै) आणि सोमवार (दि. 6 जुलै २०२६) या सलग तीन दिवसांसाठी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा जारी केला होता. मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यांचा इशारा लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवली होती. 

या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सलग तीनही दिवस महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवत सर्व विभागांच्या कामकाजाचा सातत्याने आढावा घेतला. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी संबंधित विभागांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना व निर्देश दिले आणि विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राखण्यावर भर दिला. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी अति मुसळधार पावसाचा (Red Alert) तसेच वादळी वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात आली होती. 

दरम्याऱन, भारतीय हवामान विभागाने मंगळवार, दिनांक 7 जुलै 2026 रोजी अति जोरदार पावसाचा इशारा (Orange Alert) दिला आहे. तसेच, सोसाट्याचा वारा वाहेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्या,मुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी (Park) करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे.  प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्या१त येत आहे. 

विशेष महासभेत पावसाळी दुर्घटनांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता 

मुंबई महानगरपालिकेची 9 जुलै रोजी विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे. या महासभेला सर्व नगरसेवक उपस्थित राहणार असून, गेल्या काही दिवसांत मुंबईत घडलेल्या विविध दुर्घटनांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस, झाडे कोसळणे, इमारतींचे भाग कोसळणे, पाणी साचणे आणि इतर दुर्घटनांमुळे काही मुंबईकरांना जीव गमवावा लागला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. या महासभेत विविध घटनांबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले जाण्याची शक्यता असून, नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकही होऊ शकते. त्यामुळे 9 जुलैची ही विशेष महासभा वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

ह्रदयद्रावक… भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *