पुणे : राज्यामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी या संदर्भातली माहिती दिली.उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या क्षेत्रामध्ये सर्वदूर पाऊस राहील. काही भागांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस असे दृश्य बघायला मिळू शकतं. पालघर पासून रत्नागिरी नाशिक पासून साताऱ्यापर्यंत जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
Maharashtra Rain : मयुरेश प्रभुणे काय म्हणाले?
बंगालच्या उपसागरावर तयार झालेल तीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे डिप्रेशन सध्या झारखंडवर सक्रिय आहे. पुढील 24 तासांमध्ये हे क्षेत्र वायव्येकडे सरकून पूर्व मध्यप्रदेश पर्यंत येण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा म्हणजे ऑफशर ट्रफ सुद्धा सक्रिय आहे. याच्या जोडीला कोकणाच्या लगत अरबी समुद्रावर एक चक्रीय स्थिती सुद्धा आहे. या तिन्ही गोष्टींच्या संयोगामुळे सध्या उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रामध्ये सर्वदूर पाऊस होतोय,असं हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी म्हटलं.
राज्यात काही भागांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या पण घटना घडलेल्या आहेत. ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पालघर पासून रत्नागिरीपर्यंत आणि नाशिक पासून ते साताऱ्यापर्यंत अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना घडू शकतात, असा अंदाज मयुरेश प्रभुणे यांनी वर्तवला आहे.
शासनाचं सतर्कतेचं आवाहन
7 जुलै रोजी देखील मुंबई-एमएमआरमध्ये काही प्रमाणात मुसळधार पावसाच्या सरी आणि वारा असण्याची शक्यता आहे. 6 ते 7 जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे या भागातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग उदभवू शकतो. त्यामुळे सतर्क राहावे. विशेषतः सखल भाग, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, तसेच घाट रस्त्यांवर प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.
नागरिकांनी भरतीच्या कालावधीत समुद्रकिनारी जाणे टाळावे. 6 ते 7 जुलैदरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात स्थानिक वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची तसेच काही प्रमाणात मालमत्ता नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्र, मुंबई-एमएमआर, आणि कोकणातील नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून नद्यांच्या पाणीपातळीत होणाऱ्या वाढीबाबत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासन किंवा आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.