FIFA World Cup: 8 पिवळे कार्ड आणि 3 गोल.. मोरक्को कॅनडा सामन्यात फूल राडा, असा लागला निकालImage Credit source: Getty Images
Morocco vs Canada, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंगतदार वळणावर पोहोचली आहे. प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई जिंकत अंतिम फेरीपर्यंत कोण पोहोचतं? याची उत्सुकता आहे. या स्पर्धेत मोरक्कोने पुन्हा एकदा इतिहास रचत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. राउंड ऑफ 16 स्पर्धेत मोरक्कोने यजमान कॅनडा संघाला 3-0 ने मात दिली. या विजयासह मोरक्को एकापेक्षा अधिकवेळा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला अफ्रिकी देश ठरला आहे. मागच्या पर्वात मोरक्कोने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. यंदाही टॉप संघात मोरक्कोने एन्ट्री मारल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अजेदीन औनाहीच्या गोलमुळे मोरक्कोचा विजय
मोरक्को कॅनडा सामना सुरू झाल्यानंतर दोन्ही संघ पहिल्या हाफमध्ये गोल करण्यासाठी संघर्ष करताना दिसले. पण दुसऱ्या हाफमध्ये चित्र पूर्णपणे पालटलं. अशरफ हकीमीमुळे मिळालेल्या फ्री किकचं अजेदीन औनाहीने सोनं केलं. त्याने एक राइट फुटेड शॉट मारला आणि गर्दी भेदत चेंडू गोल पोस्टमध्ये गेला. या गोलसह मोरक्कोने 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर इब्राहिम डियाजने दिलेला पास बरोबर हेरत औनाहीने पुन्हा एकदा गोल मारला आणि 2-0 ने आघाडी मिळवून दिली.
सामन्याच्या शेवटच्या मिनिटात सुफियान रहिमीने आणखी एक गोल मारला आणि कॅनडा पराभव पक्का झाला. 3-0 ने पिछाडीवर असल्याने स्पर्धेतून बाद होणार हे पक्कं झालं. झालंही तसंच.. यजमान कॅनडाचा प्रवास राउंड ऑफ 16 मध्ये संपुष्टात आला. कॅनडाने राउंड 32 मध्ये दक्षिण अफ्रिकेला 1-0 ने मात देत बाद फेरी गाठली होती.
मोरक्को कॅनडा सामन्यात राडा
मागच्या वर्ल्डकप स्पर्धेतील ग्रुप स्टेज फेरीत कॅनडा आणि मोरक्को हे संघ भिडले होते. तेव्हा मोरक्कोने 2-1 ने कॅनडाला मात दिली होती. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत मोरक्कोने नेदरलँडला पेनल्टी शूटआऊटमध्ये बाहेरचा रस्ता दाखवला आणि राउंड ऑफ 16 मध्ये एन्ट्री मारली. पण या सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू तणावात होते. या सामन्यात रेफरीने एकूण 8 यलो कार्ड दाखवले. दोन्ही संघांना प्रत्येकी 4 यलो कार्ड दाखवण्यात आले. इतकंच काय तर या सामन्याच्या 40 व्या मिनिटाला अशरफ हकिमी आणि कॅनडाचा रिची लारिया यांच्यात वाद झाला. इतकंच तर हे प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत आलं. त्यामुळे दोघांना यलो कार्ड दाखवलं गेलं.